सोलापूर : खरिपाची यंदा 3.5 लाख हेक्टरवर पेरणी  | पुढारी

सोलापूर : खरिपाची यंदा 3.5 लाख हेक्टरवर पेरणी 

सोलापूर : महेश पांढरे :  यंदाच्या हंगामात सोलापूर जिल्ह्यातील 3 लाख 43 हजार 970 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. गतवर्षापेक्षा यंदाच्या खरीप पेरणीत किमान 4 हजार हेक्टरने वाढ होणार आहे. त्यासाठी खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे.

जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र 2 लाख 34 हजार हेक्टर आहे. मात्र, गतवर्षी जिल्ह्यात सरसरीपेक्षा अधिकच्या म्हणजे जवळपास 3 लाख 40 हजार 67 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. तेव्हा कृषी विभागाने 3 लाख 75 हजार 802 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते. त्यामुळे नियोजनच्या जवळपास 90.49 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर यंदा कृषी विभागाने 3 लाख 43 हजार 970 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे नियोजन केले आहे.

यंदा सोयाबीनचे 74 हजार हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी 19 हजार 548 क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. तुरीचे 71 हजार 500 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी 1 हजार 609 क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. मुगाचे 19 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी 285 क्विंटल बियाणाची गरज आहे. उडीदाचे यंदाचे क्षेत्र 70 हजार हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी 1 हजार 575 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे.

सूर्यफुलाचे यंदाचे क्षेत्र 1200 हजार हेक्टर आहे. त्यासाठी 840 क्विंटल बियाण्यांची गरज आहे. बाजरीचे 3 हजार 500 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यासाठी 1 हजार 750 क्विंटल बियाण्यांची गरज आहे. मका या पिकाचे 55 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, त्यासाठी 11 हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अनेक दुकानांमध्ये विविध नामवंत कंपन्याचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येत असल्याची महिती कृषी विभागाने दिली आहे.

असे उपलब्ध होईल खरीप पिकांचे बियाणे

जिल्ह्याला सोयाबीनचे महाबीज कंपनीकडून 3400 क्विंटल, तर रबिनी कंपनीकडून 200 क्विंटल, तर खासगीतून 15 हजार 948 क्विंटलचा पुरवठा होणार असून, त्यापैकी आतापर्यंत 100 क्विंटलचा पुरवठा झाला आहे. तुरीच्या 1 हजार 609 क्विंटल बियाण्यांपैकी 440 क्विंटल महाबीज, तर खासगीतून 1159 क्विंटल उपलब्ध झाले आहे. उडीदाच्या एकूण 1575 क्विंटलपैकी 1470 क्विंटल महाबीजकडून उपलब्ध झाले आहे, तर रबिनीकडून 100 क्विंटल उपलब्ध झाले आहे. बाजरीच्या एकूण 1750 क्विंटलपैकी 175 क्विंटल महाबीज, तर 1575 क्विंटल खासगीतून उपलब्ध झाले आहे. मुगाच्या 285 क्विंटलपैकी 40 क्विंटल महाबीज, तर 245 खासगीतून उपलब्ध झाले आहे. मक्याच्या 11 हजार क्विंटल बियाण्यांपैकी 10 क्विंटल महाबीज, तर खासगीतून 11 हजार क्विंटलची उपलब्धता आहे.

रासायनिक खतांचा तुटवडा भासण्याची शक्यता

जिल्ह्यात रासायनिक खतांची मागणी मोठ्या प्रमणावर असून त्यापैकी युरियाची यंदा 1 लाख 25 हजार मे. टनाची मागणी आहे. त्यापैकी आतापर्यंत 47 हजार 597 मे. टन उपलब्ध झाला आहे. डीएपीची 50 हजार मे. टनाची मागणी असून, त्यापैकी आतापर्यंत 6 हजार 44 मे. टन उपलब्ध झाला आहे. एनपीके62 हजार 900 मे. टनाची मागणी आहे. त्यापैकी आतापर्यंत 20 हजार 366 मे. टन उपलब्ध झाला आहे. एमओपी 32 हजार टनाची मागणी आहे. त्यापैकी 1 हजार 400 मे. टन उपलब्ध झाला आहे. एसएसपी 22 हजार मे. टनाची मागणी असून त्यापैकी आतापर्यंत 19 हजार 898 मे. टन उपलब्ध झाला आहे. एकूण 2 लाख 91 हजार 900 मे. टनापैकी जिल्ह्याला विविध रासायनिक खतांचा आतापर्यंत केवळ 95 हजार 305 मे. टन खतांचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे जवळपास 2 लाख 33 हजार 270 मे. टन मंजूर आहे. ते वेळेत जर जिल्ह्याला उपलब्ध झाले नाही, तर जिल्ह्यातील काही भागांत तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

खते, बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नफेखोरी केल्याचे लक्षात आल्यास दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल.
– बाळासाहेब शिंदे
जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर

Back to top button