सोलापूर : बालकांची निराशा संपणार; टॉय ट्रेन सुरू होणार | पुढारी

सोलापूर : बालकांची निराशा संपणार; टॉय ट्रेन सुरू होणार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात सुरू करण्यात आलेल्या टॉय ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन ती बंद पडली. यामुळे मनोरंजनाच्या इराद्यात असलेल्या बालकांचा हिरमोड झाला. आता ही ट्रेन पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

बंद पडलेल्या टॉय ट्रेनबाबत गत आठवड्यामध्ये दैनिक ‘पुढारी’ने प्रकाशित करून आवाज उठविला होता. त्यानंतर प्रशासनाने हालचाली करत ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर तलावाभोवती टॉय ट्रेन सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उद्घाटनानंतर केवळ नऊ दिवसातच इंजन बिघडल्यामुळे ही टॉय ट्रेन बंद पडली. आता इंजिन दुरुस्त करुन सुरू करण्याच्या हालचाली करण्यात येत आहेत. यामुळे ही ट्रेन लवकरच बालकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही ट्रेन चालविण्याचा मक्ता देण्यात आला आहे.

यातून महापालिकेच्या तिजोरीत मासिक 90 हजार 700 रुपये उत्पन्न मिळणार आहे. यासाठी सहा मक्तेदारांनी सहभाग नोंदविला होता. यातून महापालिकेला मासिक 66 हजार रुपयांदरम्यान उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, या बोलीमध्ये तब्बल 90 हजार 700 रुपये मान्य झाल्याने अधिक उत्पन्न मिळणार आहे. हीही बाब समाधानकारकच आहे.

Back to top button