पंढरपूर : आषाढी यात्रेपूर्वी वज्रलेप करणार | पुढारी

पंढरपूर : आषाढी यात्रेपूर्वी वज्रलेप करणार

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री रुक्मिणी मातेच्या चरणाची झीज झाल्याने येत्या आषाढी यात्रेच्यापूर्वी मूर्तींवर वज्रलेप करण्यात येणार आहे. मूर्तीस हानिकारक ठरणार्‍या गाभार्‍यातील ग्रॅनाईटच्या फरशा काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अभिषेक घालताना दूध, दही, मध आणि साखर याचा अत्यंत मर्यादित वापर करण्यात येईल, फळा-फुलांची आरास गाभार्‍यात न करता चौखांबीच्या बाहेर करण्याचा ठराव श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

आज गुरुवारी (दि. 12) मोहिनी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक येथे आले आहेत. या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेत वारी पोहचती केली आहे, हे विशेष.

दरम्यान, मंदिर समितीच्या बैठकीस सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. पुरातत्व विभागाने अहवालात केलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झपाट्याने होणारी झीज समोर आल्यानंतर राज्य शासनाने तातडीने एक बैठक घेत भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाला मूर्तींच्या पाहणीसाठी पाठवले होते. या अधिकार्‍यांनी दि. 8 मे रोजी मुर्तीची पाहणी करुन दि. 11 रोजी आपला अहवाल राज्य शासन आणि मंदिर समितीला दिला आहे.

अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंदिर समितीच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आला. रुक्मिणीमातेच्या पायाची झीज झाली असताना हे समितीच्या निदर्शनास का आणून दिले नाही. असा विषय बैठकीत होऊन याबाबत जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय देखील बैठकीत झाला आहे.

या अहवालानुसार मूर्तीला हानिकारक ठरणार्‍या ग्रॅनाईट फारशा तातडीने काढणे, देवाला अभिषेक घालताना दूध, दही, मध आणि साखर याचा अत्यंत मर्यादित स्वरूपात वापर करणे, अभिषेकासाठी शुध्द आरओ पाण्याचा वापर करणे, अभिषेक करताना देवाच्या डोक्यावरून अतिशय हळू वेगात पाणी घालण्याचाही निर्णय घेण्यात आला. श्री विठ्ठलाचा गाभारा लहान असल्याने येथे भाविकांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात उष्णता आणि ह्युमिडिटी तयार होते.

याचाही परिणाम मूर्तीवर होत आहे. त्यामुळे गाभार्‍यात टेम्परेचर सेन्सर लावण्यात येणार आहे. यामुळे गाभार्‍यात साधारणपणे 22 ते 25 डिग्री पर्यंत तापमान राखणे शक्य होणार आहे. सध्या गाभार्‍यातील तापमान 32 ते 35 डिग्री पर्यंत जात असल्याने या उष्णतेचा त्रास मूर्तीला होत असतो. याशिवाय गाभार्‍यातील गरम हवा बाहेर जाण्यासाठी चौखांबीमध्ये व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे. भाविकांना मर्यादित संख्येत गाभार्‍यात सोडण्यात येणार आहे.

Back to top button