मायक्रो फायनान्स बँकेमुळे बचत गट उद्ध्वस्त | पुढारी

मायक्रो फायनान्स बँकेमुळे बचत गट उद्ध्वस्त

कुंभारी (सोलापूर) : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात अनेक मायक्रो फायनान्स बँका म्हणजे सूक्ष्म वित्त बँका आहेत. या सूक्ष्म वित्त बँकांनी शहरी आणि ग्रामीण भागात असलेल्या बचत गटातील महिलांना कर्जाची चांगलीच सवय लावली आहे. या सूक्ष्म बँकांमुळे अनेक महिला कर्जबाजारी झालेल्या आहेत. एकप्रकारे मायक्रो फायनान्स कंपनीमुळे जिल्ह्यातील हजारो बचत गट उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.

कमी उत्पन्न आणि समाजातील वंचित व कमजोर असलेल्या वर्गाचे सक्षमीकरणासाठी सूक्ष्म व वित्त बँका कार्य करतात, शिवाय ज्यांच्याजवळ बँकेची कुठलीही सुविधा पोहोचली नाही, अशा कमी उत्पन्न असलेल्या वर्गांना व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वस्त व्याजदरावर सूक्ष्म बँक कर्ज उपलब्ध करून देते. यामुळे गेल्या काही कालावधीत जिल्ह्यामध्ये मायक्रो क्षेत्र प्रसिद्ध होऊन गतीने वाढले आहे.

बचत गटाच्या संकल्पनेला तडा

महिलांचे सक्षमीकरण होऊन त्या आपल्या पायावर उभ्या राहतील ही बचत गटाची संकल्पना होती. ही संकल्पना नामवंत अर्थतज्ज्ञ महभूल हख यांनी मांडली होती. त्याचा फायदाही होऊ लागला होता. मात्र मायक्रो फायनान्स बँकेमुळे बचत गटाच्या संकल्पनेला सध्या तडा गेल्याचे चित्र दिसत आहे.

लहान-मोठी गावे, नगरपालिका, नगरपरिषद आणि महानगरपालिका, लहान-मोठ्या शहरातील वस्त्यांमध्ये या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आपले जाळे तयार केले आहे. प्रत्येक भागातील आठ-दहा महिलांना गोळा करून त्यांचे गट तयार केले जातात. त्यात सुरुवातीला प्रथम कर्ज असले की महिलांना जवळपास तीस हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. कर्ज कशाला हवे, कोणते उद्योग सुरू करणार, याचीही माहिती मागितली जाते. पण कर्ज मिळाल्यानंतर या महिला कर्जाचा खरा उपयोग करतात का, याकडे दुर्लक्ष केले आहे. बँकेचे अधिकारी आणि बँका यांना महिला कोणताच उद्योग करीत नसल्याची माहिती असते. त्यामुळे बँकेचा रोख कर्ज देऊन त्यांना कर्जबाजारी करण्यापलीकडे काहीच नाही. त्यातही ज्या महिलांच्या घरी गट तयार केला जातो, तिला 500 रुपयांपर्यंत कमिशन दिले जाते. काही महिला दुसर्‍यांना आपल्या नावावर कर्ज काढून देत असल्याने या महिलेलाही एका कर्ज प्रकरणामागे 2000 पेक्षा जास्त कमिशन मिळत असते.

मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज देताना महिलांना उद्योग करून महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी कर्ज दिले जाते, असे सांगितले जाते. पण, जिल्ह्यात चित्र उलटेच आहे. कर्ज मिळाल्यानंतर महिलांकडून एकही उद्योग सुरू केला जात नाही. आता मायक्रो फायनान्स संख्येने वेगवेगळे असल्याने एकाचवेळी तीन ते चार बँकांतून कर्ज घेण्याची सवय महिलांना लागली आहे. एक कर्ज संपले की दुसरे, दुसरे संपले की तिसरे, नंतर चौथे असा प्रकार सध्या जिल्ह्यात चालू आहे. यामुळे महिलांचे सक्षमीकरण होण्यापेक्षा महिला या कुटुंबासह कर्जबाजारी अधिक होऊ लागल्या आहेत.

“नवनीत राणांची सिनेमात अधिक प्रगती होईल” – डॉ. नीलम गोऱ्हे

 

Back to top button