सोलापूर : पाण्यासाठी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा | पुढारी

सोलापूर : पाण्यासाठी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

कुर्डूवाडी (सोलापूर): पुढारी वृत्तसेवा :  कुर्डू (ता. माढा) येथील ग्रामस्थांनी बेंद ओढ्यात शाप्ट क्रमांक तीनमधून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, पाणी सोडण्यात येत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी आगामी सर्व निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शनिवारच्या ग्रामसभेत एकमताने ठराव केला आहे. यामुळे बेंद ओढ्यात पाणी सोडण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कुर्डू गावाच्या परिसरात अद्यापही दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे दुष्काळात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. ओढ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाणी संघर्ष समिती स्थापन करून मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत करमाळा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी ओढ्यात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते.

यावेळी अपक्ष आमदार संजयमामा शिंदे निवडून आले आणि पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र पाणी अद्यापही सोडण्यात आले नाही. वारंवार भेटी घेऊन आमदारांकडे पाणी सोडण्याची मागणी करूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. सभा सुरू झाल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी गेली 25 वर्ष बेंद ओढ्यात पाणी सोडण्याची मागणी आहे. प्रत्येक निवडणुकीत केवळ आश्वासन मिळाले. परंतु, जर पाणी सोडण्याचे प्रयत्न होत नाही. यामुळे येथील ग्रामस्थांचे, शेतकर्‍यांचे पाण्यासाठी हाल होत असून, नागरिकांना पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बेंद ओढ्यात लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अन्यथा आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शासनाला ग्रामस्थांनी ग्रामसभेतील ठरावात केला आहे.

या सभेत सरपंच उषा नरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला उपसरपंच अण्णासाहेब ढाणे, सुधीर लोंढे, उमेश पाटील, कुमार भोसले,आनंद माळी, संतोष कापरे, अमोल गायकवाड, धनंजय गोरे, महावीर गायकवाड, चंद्रकांत जगताप, नितीन गोरे, दादासाहेब माळी, बाळकृष्ण चोपडे, अर्चना जगताप, विशाल माळी आदी सदस्य उपस्थित होते.

जनमताचा आदर करून ठराव

बेंद ओढ्यात शेतीसाठी पाणी सोडले जात नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य पद्मिनी माळी यांनी प्रस्तावाद्वारे मांडला. त्यास रसिका जगताप यांनी अनुमोदन दिले व सर्व 17 सदस्यांच्या अनुमतीसह बहुमताने हा ठराव करण्यात आला. लवकरच बेंद ओढ्यात पाणी सोडले जाईल, परंतु जनमताचा आदर करून हा ठराव आम्ही केला असल्याचे उपसरपंच अण्णासाहेब ढाणे यांनी सांगितले.

Back to top button