दोन एकरांत केळीचे 15 लाखांचे उत्पादन - पुढारी

दोन एकरांत केळीचे 15 लाखांचे उत्पादन

अशपाक सय्यद, करमाळा : तालुक्यात केळी पिकात उल्लेखनीय उत्पादन घेतले आहे. तालुक्यातील कंदर, कविटगाव परिसरातील केळी आता आखाती देशांमध्ये दुबई, इराण, इराक, ओमन मस्कत या देशांत निर्यात होत आहेत. बालाजी चौधरी यांनी दोन एकर क्षेत्रांत त्यांनी केळी पीक लागवड केली. 20 जून 2021 रोजी लागवड केली. 5 ते 6 फूट दोन रोपांमधील अंतर ठेवले. दोन ओळींमधील अंतर 6 फूट ठेवले. सध्या हे पीक 10 ते 11 महिन्यांचे असून लागवड केल्यापासून 6 व्या महिन्यामध्ये झाडाची वेण चालू होते. पुढे ते झाडाचे घड केळीला निर्यातयोग्य होण्यास 3 ते 4 महिने वेळ लागतो.

केळी परिपक्वतेनंतर म्हणजेच 10 महिन्यांमध्ये माल विक्रीस जातो. बाजारभाव साधारण 10 ते 15 रुपये भेटतो. कधी वातावरणाच्या बदलामुळे तो चढ-उतार होत राहतो. मध्यंतरी केळीचे दर गडगडले होते. निर्यात बंद झाल्याने बाजारात माल जास्त झाल्याने व व्यापार्‍यांनीही रिंग करून केळी उत्पादकांची पिळवणूक केल्याने केळी उत्पादक नाडला गेला. दोन रुपये दरानेही केळी विकली नाही. व्यापारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होता. त्यामुळे केळी उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. परिणामी, अनेकांनी केळीच्या बागा उखडून फेकल्या. अनेकांनी जेसीबी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केळी भुईसपाट केली. त्यामुळे यंदा केळी लागणीचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या मात्र निर्यात सुरू करण्यात आल्याने केळीला चागंली मागणी वाढली आहे. त्यामुळे यावर्षी केळी उत्पादक शेतकर्‍यांना चांगला भाव भेटू लागला आहे .

केळी उत्पादक शेतकरी

बालाजी चौधरी यांंना या वर्षी सुरु लागणीच्या केळीला साधारण 17 ते 18 रुपये प्रति किलो भाव भेटला आहे. सरासरी उत्पादन 52 टन मिळण्याची अपेक्षा आहे. केळीचे क्षेत्र 2 एकर असून त्यात रोपांची संख्या 2400 आहे. साधारण सरासरी एका घडाचे वजन 45 किलो पर्यंत मिळत आहे. त्यामुळे या दोन एकरांत अपेक्षित उत्पन्न 52 टन असून यंदा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

पाणी व्यवस्थापन …

ड्रिपव्दारे पाणी द्यावे लागते. उसाच्या तुलनेत पाणी कमी लागते.
परंतु, रोज 4 तास पाणी द्यावे लागते. झाडे पक्वतेच्या काळात योग्य नियोजन करून पाणी व खत याचा ताळमेळ घातल्यास अधिकाधिक उत्पन्न मिळेल. 3 एप्रिलपासून सध्या काढणी चालू झाली असून पहिल्या टप्प्यात 10 टन माल निघाला आहे. तो 17 रु. प्रतिकिलो प्रमाणे दर मिळाला असून त्याचे उत्पन्न 1 लाख 70 हजार रुपये मिळाले आहे.
अजून येत्या 20 दिवसांत संपूर्ण काढणी होईल. अपेक्षित उत्पन्न आणखी जास्त निघेल, असा अंदाज आहे. जर बाजारभाव टिकून राहिला तर 15 लाख 53 हजार रुपये होतील.

खर्च व्यवस्थापन…

2400 रोपांचा 50 हजार रुपये खर्च, ड्रिप 60 हजार रुपये खर्च, नांगरणी, फणणी, रानाची मशागत यासाठी 20 हजार रुपये खर्च आला आहे. केळीसाठी खते व औषधे एकरी एक लाख रुपये असे दोन एकराला दोन लाख रुपये आला आहे. असा सर्व खर्च 2 एकराचा 3 लाख 10 हजार रुपये झाला आहे.
सर्व खर्च वजा जाता 12 लाख 53 हजार रुपये भेटतील. (बाजार 17 रुपये प्रतिकिलो भाव टिकून राहिल्यास).
विशेष दुःख याचे होते की शासनाचा व्यापार्‍यांवर अंकुश नसल्याने व्यापारी शेतकर्‍यांची प्रचंड पिळवणूक करतात. निर्यातक्षम मालाला समाधानकारक दर मिळू लागला किंवा केळी उत्पादक शेतकर्‍यांना थोडा जास्त भाव मिळू लागला की व्यापारी अडवणूक करतात व मालाची किंमत कमी करतात. त्यामुळे भाव चढ-उतार होत राहतो ते व्यापारीच जास्त करतात. शेतकर्‍यांना याचे ज्ञान नसते. त्यामुळे केळी नाशवंत असल्याने त्याची विक्री करावीच लागते. माल बागेत ठेवता येत नाही. त्यानंतर मालाला चिलिंग, तांबोरा, अळी, डासांचा प्रादुर्भाव, कडकी यामुळे फार काळ केळी टिकत नाही.

त्यामुळे तत्काळ निर्णय घेऊन केळी व्यापार्‍यांना देऊन बाग रिकामी करावी लागते. मागच्या मार्च महिन्यात 23 रु. प्रतिकिलो केळीला भाव भेटत होता. त्यामुळे नोकरदार वर्गाने व ग्राहकांनी शेतकर्‍यांचा माल घेताना घासघीस करू नये. दोन पैसे शेतकर्‍याला मिळू लागले की लगेच महागाईचा भडका उठतो. सर्वत्र म्हणे महागाई वाढली, किंमती वाढल्या, अशी आवई उठवली जाते व केळी, कांदा पिकांचे दर खाली आणले जातात, अशी खंत बालाजी चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

खत व्यवस्थापन

केळीला दर 5 दिवसांनी वेगवेगळ्या खतांची अवस्थेनुसार मात्रा ड्रिपव्दारे दिली. त्यामुळे खर्च पण वाढत आहे परंतु ऊस पिकाच्या तुलनेत केलेला खर्च निघतो. व तो उसाच्या खर्चापेक्षा परवडतो. त्यामुळे वेळच्या वेळी खत देणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यातीत प्रथम क्रमांक लागतो. कंदर, कविटगाव, चिखलठाण, शेटफळ, कुगाव, सौंदे, गुळसडी आदी तालुक्यांतील गावात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड झाली आहे. उजनी धरणाच्या काठाला ऊस शेती तसेच केळीची शेती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. कविटगावचे प्रगतशील शेतकरी बालाजी अनिल चौधरी यांनी दोन एकरांत, दहा महिन्यांत 15 लाखांचे उत्पादन घेऊन शेती व्यवस्थापनाचे वेगळेपण दाखवून दिले आहे.

Back to top button