सोलापूर : बहिष्कृत करून दोन लाखांची खंडणी मागितली; ५ पंचांना अटक - पुढारी

सोलापूर : बहिष्कृत करून दोन लाखांची खंडणी मागितली; ५ पंचांना अटक

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : पत्नी माहेरी गेल्याने दोन वर्षांपासून एकाला दोन वर्षे जातीतून बहिष्कृत केले. तसेच पुन्हा पत्नीला नांदविण्यासाठी न्यावयाचे असल्यास दोन लाख रुपये द्यावेत, अशी समाजातील पाच पंचांनी मागणी केली.

या प्रकरणी सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून पाचजणांना अटक केली. पंच – राम धोंडिबा शिंदे-पाटील, अशोक शिंदे- पाटील, नाना शिंदे- पाटील, संतोष राम शिंदे, उत्तम शिंदे (सर्व रा. न्यू शिवाजी नगर, गोंधळे वस्ती, अक्कलकोट रोड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी शरणीदास पांडुरंग भोसले (वय 40, रा. मांगले ता. शिराळा, सांगली, सध्या रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भोसले हे भांडीविक्रीचा व्यवसाय करतात.

याबाबत माहिती अशी की, शरणीदास यांचा विवाह 20 जुलै 2003 रोजी माया परसराम ननवरे (रा. कोल्हापूर) हिच्याबरोबर झाला होता. लग्नानंतर त्यांना तीन मुले झाली. त्यानंतर माया ही सन 2013 मध्ये किरकोळ कारणावरून भांडण करून कोल्हापूर येथे माहेरी गेली होती.

त्यानंतर शरणीदास यांची सासू सुलोचना ननवरे ही शरणीदास यांची बहीण संतोषी अवघडे यांच्या घरी गेली. त्यांनी शरणीदासच्याही पत्नीची समजूत घालून पुन्हा नांदावयास पाठविले.

त्यानंतर माया थोडे दिवस व्यवस्थित राहिली. त्यानंतर किरकोळ कारणावरून भांडण करू लागली व आत्महत्या करेन व निघून जाईन अशा धमक्या देवू लागली. त्यातून माहेरी निघून जात होती.

दरम्यान, सन 2018 मध्ये माया व सासू सुलोचना यांनी जातपंचायती मार्फत शरणीदास यांच्यावर दबाव आणून पत्नीस घेवून जाण्यास सांगितले. तेेव्हा जातपंचायतीसमोर जाण्यासाठी शरणीदास हे न्यू शिवाजी नगर, गोंधळे वस्ती, अक्कलकोट रोड येथे गेले.

तेथील समाजमंदिरात वरील पाच पंचानी शरणीदास यांचे काहीही न ऐकता शरणीदास व त्यांच्या 3 मुलांना जातीतून बाहेर काढून बहिष्कार टाकले. त्यांच्यावर तीन वर्षे बहिष्कार टाकला.

त्यानंतर पंच कमिटीतील अशोक शिंदे-पाटील यांनी शरणीदास यांना तुला समाजात घ्यावयाचे असल्यास व तुझ्या बायकोला नांदावयास पाठवायचे असल्यास 2 लाख रूपये दे अशी मागणी केली.

याप्रकरणी शरणीदास याने एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादी वरून वरील 5 पंचांविरूध्द भादवि कलक 384 सह कलम महाराष्ट्र सामाजीक बहिष्कार अधिनियम 2016 चे कलम 3,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. एमआयडीसी पोलिसांनी पाचही पंचांना अटक केली. त्याच पाच पंचाना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Back to top button