सोलापूर मार्केट यार्ड परिसरात भीषण अपघातात, 5 ठार | पुढारी

सोलापूर मार्केट यार्ड परिसरात भीषण अपघातात, 5 ठार

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर मधील मार्केट यार्डसमोर थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून मोटार कारने जोराची धडक दिली. सोमवारी (दि. 25) दुपारी एकच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन लहान मुलांसह पाचजण ठार, तर चारजण गंभीर जखमी झाले. चालक वगळता सर्वजण सांगली जिल्ह्यातील मिरज येथील एकाच कुटुंबातील असून, ते अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले असताना काळाने घाला घातला.

भरगर्दीत झालेल्या या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. नागरिकांसह पोलिसांनी जखमींच्या मदतीसाठी धावाधाव केली. कारचालक सचिन अण्णासाहेब शितोळे (वय 35, रा. उगार, ता. धारवाड), दिलीप जाधव (35), सोनाबाई जाधव (35), आरोही जाधव (7) व 7 महिन्यांचा चिमुकला (अद्याप बारसे झाले नाही, सर्व रा. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.

तर कारमधील वर्षा सचिन शितोळे (वय 28), रेखा दिलीप जाधव, इशा जाधव, विनायक घोरपडे अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

जाधव व शितोळे कुटुुंबीय हे मिरजहून इनोव्हा कारमधून (क्र. एमएच12/डीव्ही 5061) आज सकाळी देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांनी प्रथम पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर

ते सर्वजण दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटला जाण्यासाठी सोलापुरात मार्केट यार्ड जवळ पोहोचले होते. त्यावेळी महामार्गाच्या वळणावर चालकाला वाहनाचा वेग आवरला नाही आणि त्याने रस्त्याकडेला थांबलेल्या मालट्रक (क्र. एमएच12/क्यूडब्लू 9587) ला मागून जोराची धडक दिली.

हा अपघात एवढा भयानक होता की, यात कारचा समोरून निम्म्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यामध्ये मृतदेह व जखमी अडकून होते. भर रस्त्यावर गर्दीत झालेल्या अपघातानंतर यावेळी बघ्यांची गर्दी झाली. त्यातील काहींनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली.

जेसीबीच्या सहायाने मृतदेह, जखमींना बाहेर…

यावेळी ट्रकपासून कार बाजूला करण्यासाठी पोलिसांनी दोन जेसीबी मागवून घेतले. जेसीबीच्या सहाय्याने मृतांना व जखमींना बाहेर काढण्यात आले. सर्वांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त गायकवाड यांनी स्वत: शासकीय रूग्णालयात जावून जखमींची चौकशी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button