अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल | पुढारी

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरुन मराठा जाती विरोधात खुल्या व ओबीसी प्रवर्गातील जातींना भडकविणे तसेच चिथावणीखोर वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण केल्या प्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी २७ जून २०१९ रोजी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दिलेल्या निकालाविरुध्द नापसंती दर्शवली होती. त्यांच्या निर्णयावर शंका घेऊन निकाल देणारे न्या. रणजित मोरे हे मराठा जातीचे आहेत, असे म्हणून त्यांची जात काढून, मराठे हे शुद्र आहेत, अशी भाषा वापरली होती. न्या. रणजित मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे ऐकून त्यांच्या दबावाखाली मराठा समाजाच्या बाजूने सेटींग-बेटींग करुन निकाल दिला आहे, असाही आरोप सदावर्ते यांनी केला होता.

जाणीवपूर्वक न्यायाधीशांविषयी जातीय व्देषातून अवमानकारक भाषा वापरुन न्यायमूर्तींची बदनामी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाचे न्यायनिर्णयावर संशय घेऊन ओबीसी जाती, खुल्या प्रवर्गातील ब्राम्हण, वैश्य, आर्य या जातीमध्ये तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ए. बी. व्ही. पी. संघटना यांच्यात व मराठा समाजामध्ये जातीय व्देष निर्माण होऊन तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. सार्वजनिक शांतता भंग होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य करुन मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केला. या प्रकरणी सदावर्ते यांच्याविरुध्द योगेश पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button