पंढरपूर : तिघांच्या अत्याचारातून बाळाचा जन्म | पुढारी

पंढरपूर : तिघांच्या अत्याचारातून बाळाचा जन्म

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : नारायण चिंचोली (ता.पंढरपूर) येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ दोन तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात पुरुष जातीच्या बाळाला रस्त्याच्या मधोमध सोडून मातेने पलायन केले होते. या घटनेत तीन जणांनी केलेल्या अत्याचारातून हे मूल जन्मले असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. आता या बाळाचे वडील कोण हे तपासण्यासाठी तिघांची डी.एन.ए. टेस्ट करण्यात येणार आहे. दोन आरोपींना अटक केली आहे, तर तिसरा फरार आहेे.

पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील अविनाश नागनाथ वसेकर (वय 32) हे त्यांचे कुटुंबासह शनिवार, दि. 20 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 च्या सुमारास मायाक्का चिंचणी देव दर्शना करीता त्यांच्या चारचाकी गाडीने जात होते. या दरम्यान ते नारायण चिंचोली गावच्या पाण्याच्या टाकीच्या समोर साईराज ढाब्याजवळ आले असता त्यांना रस्त्याच्या मध्यभागी एक नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक कपड्यात गुंडाळून ठेवल्याचे दिसून आले. साधारणपणे 2 तासापूर्वीच बाळ जन्मलेले असल्याचे दिसून आले.

वसेकर यांनी तत्काळ पोलिसांनी याची माहिती दिली आणि त्यानंतर अविनाश वसेकर यांनी त्या बाळास उपचारासाठी डॉ. शितल शहा हस्पीटल पंढरपूर येथे आणुन दाखल केले. त्याठिकाणी बाळावर त्या रुग्णालयात 17 दिवस मोफत उपचार करण्यात आले. उपचारानंतर बाळाला नवरंगे बालकाश्रमात देखभालीसाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी मुलीचे आई-वडील, रिक्षाचालक, मुलीचा भाऊ, यांच्यावर पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर अत्याचार करणार्‍या तीन आरोपींवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या दोन आरोपींचे, जन्मलेल्या बाळाचे व जन्मदात्या मातेचे डी. एन. ए. तपासण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
– मिलिंद पाटील
पोलिस निरीक्षक

तिघांनी केला अत्याचार

या प्रकरणात संबंधित लोकांना अटक केल्यानंतर त्या लहान बाळाची आई अल्पवयीन असल्याचे उघड झाले. मात्र, त्या अल्पवयीन मुलीबरोबर तिघांनी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले होते, हे त्या आरोपींनी मान्य केले आहे. त्यामुळे त्या मुलाचा पिता कोण हे ठरवणे मुश्कील झाले आहे. याप्रकरणी किरण उर्फ भैय्या शशिकांत दावणे (रा. देगाव) व दत्ता परमेश्वर खरे (रा. ईश्वर वठार) या दोन तरुणांना अटक केली असून आणखीन एका आरोपीच्या शोधात पोलिस आहेत. तसेच, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button