सोलापूर : सांगोला शहरात शाळा-कॉलेजजवळच गुटखा विक्री | पुढारी

सोलापूर : सांगोला शहरात शाळा-कॉलेजजवळच गुटखा विक्री

सोलापूर /सांगोला : पुढारी वृत्तसेवा :  ज्ञान मंदिर अर्थात शाळेपासून शंभर मीटर परिसरात तंबाखू व गुटखा विक्रीच्या दुकानांना मनाई आहे, असे शासनाचे आदेश आहेत. हे आदेश धाब्यावर बसवून अनेक कॉलेज-शाळांच्या परिसरात गुटखा विक्री जोमात सुरू आहे. संबंधित विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. परिणामी, कारवाई करण्यामध्ये प्रशासन असमर्थ असल्याची संतप्त भावना पालकवर्गातून व्यक्त होत आहे.

सांगोला शहरामधूनअवैध गुटखा होलसेल दरात शहरासह तालुक्यातील सर्वच गावागावांत राजरोसपणे पोहोच केला जातो. त्याचप्रमाणे शेजारच्या जिल्ह्यांमध्येही सांगोल्यामधूनच होलसेल दरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची वितरण व्यवस्था केली जाते. याकडे अन्न व औषध प्रशासन, पोलिस दुर्लक्ष करीत आहेत. या होलसेल गुटखा विक्रेत्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी वरिष्ठ पातळीवरून अधिकार्‍यांनी लक्ष घालणे काळाची गरज आहे.

शाळेच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घातली असली तरी त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. सांगोला शहर आणि तालुक्यातील अनेक शाळांसमोर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. मात्र, प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना प्रशासन कारवाई करेल का, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

आरोग्यास घातक ठरणार्‍या गुटखा, तंबाखूच्या सेवनाचे धोके समजून सांगण्यापलीकडे शाळेत काहीही होत नाही. ठोस उपाययोजनेसाठी शाळेच्या परिसरातील गुटखा विक्री रोखणे आवश्यक आहे. ते रोखण्याकडे संबंधित प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यासह शाळेच्या 100 मीटर परिसरात गुटखा विक्रीस बंदी असल्याचे फलक प्रत्येक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावणे बंधनकारक असले तरी त्याची एकाही शाळेने दखल घेतलेली नाही. परिणामी, आजची तरुण पिढी गुटख्याच्या आहारी जात आहे. गुटखा सेवनाने कर्करोग होतो. याची पहिली पायरी म्हणजे तोंड उघडता न येणे ही असते. आरोग्यास धोका निर्माण होतो. असे असतानाही यावर प्रशासन बंधन घालत नसल्याने नागरिकांमधून या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. किमान ज्ञान मंदिर असणार्‍या ठिकाणी तरी गुटखा विक्री करण्यास बंदी घालावी, अशी मागणी आता पालक वर्गातून जोर धरत आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून सांगोला तालुक्यात गेल्या महिन्यामध्ये दोन ते तीनवेळा कारवाई केली होती. त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली नाही, यामुळे कारवाई झाली नाही. नागरिकांनी होलसेल गुटखा वितरणाबाबतची माहिती आमच्या प्रशासनाला दिल्यावर आम्ही निश्चितच त्यावर कारवाई करू.
– उमेश भुसे
अन्न व औषध प्रशासनाधिकारी, सोलापूर

Back to top button