सोलापूर : तांड्यावरील हातभट्टीचा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

सोलापूर : तांड्यावरील हातभट्टीचा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा :  दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांड्यावरून शहरातील नीलमनगर परिसरात होणारी हातभट्टी दारूची वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडून 3 लाख 45 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
हैद्राबाद रोडवरील मुळेगाव तांडा येथून शहरात हातभट्टी दारूची वाहतूूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून शहरातील विविध ठिकाणी पथकाकडून सापळे रचण्यात आले होते.

या सापळ्यांमध्ये हातभट्टी दारूची वाहतूक करणारी तीन दुचाकी वाहने पकडून तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 480 लिटर हातभट्टी दारू जप्त करून 3 गुन्हे नोंद करण्यात आले. तसेच नीलमनगर परिसरात हातभट्टी दारू दुचाकीवरून घेऊन येणार्‍या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 600 लिटर हातभट्टी दारू जप्त करून चार गुन्हे दाखल करण्यात आले.

या संपूर्ण कारवाईत 7 दुचाकी जप्त करून 7 जणांना अटक करून 1080 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक एस. एम. मस्करे, एस. एस. फडतरे, एस. एस. कदम, दुय्यम निरीक्षक ए. आर. आवताडे, एस. डी. झगडे, जवान जी. आर. होळकर, एस. ए. बिराजदार यांनी केली. तांड्यावर सुधारणेचे उपक्रम राबविले जात असताना अद्यापही दारू उत्पादन होत असल्याचे दिसून येत आहे.

मानसिकताच नाही ?

हातभट्टी दारूच्या व्यवसायातून तांड्यावरील नागरिकांनी कायमचे बाहेर पडून चांगल्या उद्योगाला लागावे म्हणून सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने ऑपरेशन परिवर्तन राबविण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नांमुळे हातभट्टी व्यवसायातील 41 महिलांनी या व्यवसायातून कायमचे बाहेर पडून मुळेगाव तांडा येथे परिवर्तन उद्योग समूह उभारून गारमेंटस्च्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. परंतु, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईवरून हातभट्टी व्यवसायातून बाहेर पडण्याची तांड्यावरील नागरिकांची मानसिकता नाहीच का, असा प्रश्न उपस्थित होतो.

Back to top button