सोलापूर : लहान भावाच्या बारावीच्या पेपरला बसला मोठा भाऊ, दोन्ही भावांविरूद्ध गुन्हा दाखल | पुढारी

सोलापूर : लहान भावाच्या बारावीच्या पेपरला बसला मोठा भाऊ, दोन्ही भावांविरूद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  लहान भाऊ चैतन्य पवार याचा अभ्यास न झाल्याने त्याच्याऐवजी त्याचा मोठा भाऊ योगेशने बारावीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपप्राचार्यांनी दोन्ही भावांविरूद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या वरून चैतन्य अंगद पवार (वय 18) व योगेश अंगद पवार (वय 22) (दोघे रा. कर्देहळ्ळी ता.दक्षिण सोलापूर) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत दयानंद कॉलेजचे उपप्राचार्य अरूण खांडेकर यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, 19 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास दयानंद आर्टस अ‍ॅन्ड सायन्स कॉलेजमध्ये 12 वीची परीक्षा सुरू होती.
या केंद्रावर अर्थशास्त्राचा पेपर सुरू होता. यावेळी पर्यवेक्षक असताना खोली क्रमांक 106 मध्ये तपासणी कामी गेल्यावर परीक्षार्थी रोल क्रं. पी-156417 या विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटावर फोटो संशयास्पद वाटल्याने त्याची तपासणी केली. त्या रोल नंबरवर चैतन्य अंगद पवार याने परीक्षा देणे गरजेचे असताना चैतन्य ऐवजी त्याचा मोठा भाऊ योगेश पवार हा परीक्षा देत होता. पर्यवेक्षकाला संशय आल्याने त्याचे बिंग फुटले. यापूर्वीर्ही योगेश याने बोर्डाची तोंडी परीक्षा व इंग्रजीचा पेपर तसेच सध्या बारावीचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर योगेश याने स्वत: तोतया विद्यार्थी म्हणून दिल्याचे उघड झाले.

हजेरी पत्रकावर सही करून चैतन्य याचे हॉलतिकीट घेऊन उत्तर पत्रिका लिहून परीक्षा हजेरी पत्रकावर चैतन्य पवार याची बनावट सही केली. व बारावी पुणे बोर्डाची फसवणूक केली. या फिर्यादीवरून चैतन्य पवार व योगेश पवार या पवार बंधूविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास जोडभावी पोलिस करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Back to top button