सोलापूर : दुकान नसतानाही चक्क व्यापारी परवाना | पुढारी

सोलापूर : दुकान नसतानाही चक्क व्यापारी परवाना

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुकान नसतानाही अशा व्यापार्‍यांना बाजार समिती परवाना दिला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक करून व्यापारी निघून जात असल्यामुळे बाजार समितीसह शेतकर्‍यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 1200 आडत दुकानदार आहेत, तर खरेदीदार व्यापारी 200 ते 250 आहेत. बाजार समितीने गाळे बांधून व्यापार करण्यासाठी आडत दुकानदारांना दिले. परंतु, पुढे गाळे कमी पडत असल्याने बाजार समितीने अनेक आडत दुकानदारांना परवाना दिला. आडत दुकानदारांचे परवाने वाढल्याने बाजार समितीला उत्पन्नदेखील चांगले मिळत आहे. परंतु, एका घरातील व्यक्तींना व्यापार करण्याचा परवाना दिला पाहिजे, जेणेकरून शेतकर्‍यांची फसवणूक होऊ शकणार नाही. कारण, अनोळखी बाहेरील व्यक्ती येऊन काही दिवस आडत दुकान चालवून अचानकच बाजार समितीसह शेतकर्‍यांचे पैसे न देताच पळून जात आहेत. ज्यांना दुकान दिले आहे तो आडत दुकानदार संबंधित दुसर्‍या आडत्याकडून स्टॅम्प पेपरवर लिहून बाजार समितीकडे देतात. परंतु, अचानक शेतकर्‍यांना टोपी घालून आडते निघून गेल्यानंतर मूळ आडत दुकानदारदेखील त्यावेळी हात वर करतात.

सध्या बाजार समितीमध्ये एका गाळ्यामध्ये एका आडत दुकानदारांपेक्षा अधिक आडते व्यापारी करीत आहेत. सर्वच आडते फसवणूक करीत नाहीत हे जरी सत्य असले तरी मूळ ज्यांना बाजार समितीने दुकान दिले आहे, त्यांचे नाव बदनाम होत आहे. यामुळे येथील बाजार समितीच्या शेतमालाच्या आवकवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे बाजार समितीने एका गाळ्यात जरी चार पाच आडत्यांना परवाना दिला तरीही एकाच घरातील व्यक्तींना तो परवाना द्यावा, जेणेकरून शेतकरी व बाजार समितीची फसवणूक करण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

दरम्यान, शेतकर्‍यांचे पैसे न दिल्यामुळे बाजार समितीने आतापर्यंत अनेक आडत्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे बर्‍यापैकी आडत्यांनी शेतकर्‍यांचे पैसे परत केले आहेत. परंतु, काही आडते फसवणूक करून फिरकतदेखील नसल्याने त्यांच्यावर कारवाई करणे कठीण होत आहे. हे व्यापारी मोठ्या प्रमाणात कांदा विभागातील आहेत. कांदा विभागात व्यापार्‍यांची संख्या अधिक असल्याने सर्वाधिक फसवणूक होण्याचे प्रमाण तिथेेच आहे.

लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक फसवणूक…

लॉकडाऊन काळात व्यापार्‍यांचे नुकसान झाल्याने बर्‍याच आडत दुकानदारांनी शेतकर्‍यांचे पैसे बुडविले होते. परंतु, सभापती संचालकांनी शेतकर्‍यांचे पैसे मिळावे, यासाठी तगादा लावल्यानंतर 25 ते 30 व्यापार्‍यांकडून पैशाची वसुली झाली आहे. परंतु, फसवणूक होऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Back to top button