सोलापूर : कोपेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी 100 कोटींचा निधी देणार | पुढारी

सोलापूर : कोपेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी 100 कोटींचा निधी देणार

सोलापूर / कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा :  पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिराच्या दुरुस्तीला युद्धपातळीवर सुरुवात करणार आहे. 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आणखी 100 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.

दै. ‘पुढारी’ने ‘खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला तडे; अद्भुत स्वर्गमंडप कोसळण्याची भीती’ या शीर्षकाखाली कोपेश्वर मंदिराची विदारक स्थिती सचित्र उघडकीस आणल्यानंतर खळबळ उडाली होती. शासकीय स्तरावर याची गंभीर दखल घेत राज्यमंत्री डॉ. पाटील-यड्रावकर यांनी रविवारी सकाळी पाहणी केली. दै. ‘पुढारी’शी बोलताना डॉ. पाटील-यड्रावकर म्हणाले, मंदिराच्या दुरुस्तीसाठी शनिवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस्चे मुख्य श्रीमती शिखा जैन, किरण कलमदानी यांनी दुरुस्तीचा आराखडा तयार केला असून यासाठी 110 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. यापूर्वी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आणखी अपेक्षित असलेल्या 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन शिल्प वैभवाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात करणार असल्याचे सांगितले.

यावेळी सरपंच हैदरखान मोकाशी, दयानंद खानोरे, जब्बार मोकाशी यांनी मंदिराच्या काही भागाच्या झालेल्या विदारक परिस्थितीची माहिती दिली. यावेळी पोलिसपाटील सौ. दीपाली पाटील, सचिन पाटील, हिदायत मुजावर, दादाखान मोकाशी, दयानंद माने, दस्तगीर जमादार, इर्षाद मुजावर आदी उपस्थित होते.

Back to top button