साेलापूर : टेंभुर्णीत चोरट्यांकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

साेलापूर : टेंभुर्णीत चोरट्यांकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

टेंभुर्णी : पुढारी वृत्तसेवा : टेंभुर्णी शहरात महिन्याभरापूर्वी झालेल्या चोरी प्रकरणातील चार अट्टल घरफोडी करणार्‍यांना टेंभुर्णी पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 10.05 तोळे सोने व 9 भार चांदी असा चोरीतील मुद्देमालही जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टेंभुर्णी शहरात महामार्गावर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या एका अपंग कुटुंबाच्या घरावरील पत्रे उचकडून चोरट्यांनी घरातील 15.5 तोळे सोन्याचे दागिने व त्यांच्या आईचे तीन तोळे सोन्याचे दागिने व 12 भार चांदी असा एकूण 7 लाख 23 हजार 70 रुपयांचा ऐवज चोरी करून नेला होता, तसेच जाताना घरातील लोकांना आरडाओरड करू नका अशी दमदाटी केली होती. याबाबत लक्ष्मी तातोबा शिंदे (रा.कुर्डूवाडी बायपास रोड, टेंभुर्णी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सापळा रचून अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये नीलेश मगन खरात (वय 34, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, टेंभुर्णी), त्याचा साथीदार शंकर रोहिदास धोत्रे (वय 25, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, टेंभुर्णी), सूरज किशोर टेके (रा. नागनाथनगर, टेंभुर्णी) व सूर्यकांत बाळासाहेब ठोंबरे (वय 36, रा. सुर्डी, ता. केज, जि.बीड व हल्ली रा. विठ्ठल-रखुमाईनगर, टेंभुर्णी) अशी अटक केलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत.

हा तपास पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोनि सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने केली. या घटनेचा तातडीने तपास करून अपंग पीडित कुटुंबास न्याय द्यावा, अशी मागणी अपंग संघटनेने व प्रहार संघटनेने पोलिसांकडे केली होती.

Back to top button