सोलापूर :  रुग्णालयांनी दरपत्रक हटवले : रुग्णांची पुन्हा लूट | पुढारी

सोलापूर :  रुग्णालयांनी दरपत्रक हटवले : रुग्णांची पुन्हा लूट

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा : कोरोनाकाळात खासगी रुग्णालयांनी अवाजवी देयके आकारल्याच्या तक्रारींमुळे महापालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना बंधनकारक केलेले दरपत्रक अद्यापही अनेक ठिकाणी लागलेले नाही. रुग्णालयांकडून मात्र अव्वाच्या सवा बिले वसूल करण्याचा सपाटा सुरूच आहे.

कोरोनाकाळात रुग्णालयातील बेडची संख्या मर्यादित असल्याने तसेच रुग्ण संख्या अधिक असल्याने अनेक रुग्णालयांत उपचारासाठी रांगा लागल्या होत्या. परंतु, याचकाळात अनेक रुग्णालयांनी भरमसाट बिले आकारुन रुग्णांची लूट चालवली होती. याविषयीच्या अनेक तक्रारी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे आल्या होत्या.

वाढीव देयकांविषयीच्या तक्रारींची दखल घेत पालिकेने देयके लेखापरीक्षण समिती नेमली आणि रग्णालयांना आपल्या सेवांचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले होते. तेव्हा या लेखापरीक्षण समितीने रुग्णालयात जाऊन रुग्णालयांनी दरपत्रक दर्शनी भागात लावले की नाही, याची पडताळणी केली होती.

मात्र, कोरोना प्रादुर्भाव कमी होताच अनेक रुग्णालयांनी हे दरपत्रकाचे फलक तातडीने हटविले. उपचाराच्या नावाखाली अनावश्यक असलेल्या चाचण्या, औषधे, उपकरणे, वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटीच्या नावाखाली रुग्णांकडून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. या लुटीमुळे मात्र रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णांची लूट सुरू असून अनेक रुग्णालये अधिकच्या चाचण्या आणि औषधांचा जादा वापर दाखवून बिले फुगवतात. त्यामुळे रुग्णालयात दरपत्रक असणे आवश्यक आहे.

नियम काय सांगतो…

महाराष्ट्र शासनाने नर्सिंग अ‍ॅक्टमध्ये (महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम) काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार सर्व रुग्णालयांनी दर्शनी भागात सुविधांचे दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये प्रवेश शुल्क, प्रति दिन आंतर रुग्ण दर (खाट/अतिदक्षता कक्ष), वैद्य शुल्क (प्रति भेट), सहायक वैद्य शुल्क (प्रति भेट), भूल शुल्क (प्रति भेट), शस्त्रक्रिया शुल्क, शस्त्रक्रिया सहायक शुल्क, भूल सहायक शुल्क (प्रति भेट), शुुश्रूषा शुल्क (प्रति भेट), सलाईन व रक्त संक्रमण शुल्क, विशेष भेट शुल्क, मल्टिपॅरा मॉनिटर शुल्क, पॅथॉलॉजी शुल्क, ऑक्सिजन शुल्क, रेडिओलॉजी व सोनोग्राफी शुल्क यातील ज्या सेवा रुग्णालये देत असतील त्यांचे दरपत्रक

रुग्णालयाच्या दर्शनी भागात असावे, असे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र नर्सिंग अ‍ॅक्टच्या नियमांनुसार प्रत्येक रुग्णालयांनी उपचाराचेे दरपत्रक लावणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजनांखालरी करण्यात येणार्‍या उपचारांविषयीची माहितीदेखील रुग्णालयांमध्ये लावणे गरजेचे आहे. अशाप्रकारचे फलक लावल्यास गोरगरीब रुग्णांना त्याबाबतची माहिती मिळून उपचार करणे सोयीस्कर होणार आहे. परंतु, रुग्णालयांकडून याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येते.
– रमेश मोटे
सचिव, रुग्ण हक्क परिषद, सोलापूर.

Back to top button