सोलापूर : बनावट सही, शिक्क्याने मुख्याध्यापकांची फसवणूक | पुढारी

सोलापूर : बनावट सही, शिक्क्याने मुख्याध्यापकांची फसवणूक

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : मार्कंडेय विद्यालयातील मुख्याध्यापकांची बनावट सही करून व शिक्क्यांच्या आधार घेत कर्ज प्रकरण मंजूर करून फसवणूक केल्याप्रकरणी दोन सहशिक्षकांसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अन्य संस्थांमध्ये असे प्रकार घडत असून याबाबत संस्था, पदाधिकारी व बँकांनी सतर्क राहण्याची वेळ आली आहे.

दोन सहशिक्षक अर्जुन लक्ष्मण आनंदकर, मुरलीधर ज्ञानदेव कडलासकर व राजू अर्जुन आनंदकर (तिघे रा. सोलापूर) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मार्कंडेय विद्यालयाचे मुख्याध्यापक दुंडप्पा भगवंत कुर्ले (वय 46, रा. महेश थोबडेनगर, शेळगी) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

यात म्हटले आहे की, 4 जून 2019 ते 29 डिसेंबर 2019 यादरम्यान लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अवंतीनगर शाखा येथे 4 जून 2019 रोजीचे मंजूर कर्ज प्रकरणातील सहशिक्षक आनंदकर व कडलासकर यांनी स्वत:ला जामीनदार केले व राजू आनंदकर या तिघांनी मिळून बनावट शिक्क्याच्या आधारे प्रमाणपत्रावर बनावट शिक्का व मुख्याध्यापक दुंडप्पा कुर्ले यांची खोटी सही केली. मार्च, एप्रिल व मे 2019 चे बनावट सही व शिक्क्याचे वेतन प्रमाणपत्र तयार केले व ते कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी ते खरे आहे, असे भासवून फसवणूक केली.

या फिर्यादीवरुन दोन सहशिक्षकांसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या तिन्ही शिक्षकांकडून आणखी काय अशी बनावटगिरी करण्यात आली आहे का, याचीही चौकशी करणे आवश्यक आहे. अनेक शैक्षणिक संस्थांच्या कार्यालयांमधील शिक्के कुठेही पडलेले असतात. ते कोणालाही सहजरीत्या उपलब्ध होतात. याचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार करण्याबरोबरच बनावट कर्जे काढण्याचेही प्रकार वाढत आहेत. यामुळे संस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा तपास फौजदार चावडीचे पोलिस करीत आहेत.

Back to top button