साेलापूर : सांगोला तालुक्यातील नद्या, ओढे पोखरले | पुढारी

साेलापूर : सांगोला तालुक्यातील नद्या, ओढे पोखरले

सागोला : पुढारी वृत्तसेवा
सांगोला तालुक्यातील माण, कोरडा, अफ्रुका, बेलवण या सर्वच नदी, ओढे परिसरांतील गावात वाळू तस्करीने धुमाकूळ घातला आहे. वाळू तस्कर कधी काय शक्कल लढवतील ते सांगता येत नाही. परंतु, त्यांच्या या नवीन अटकळीस शासनाचे व कायद्याचे ठेकेदार म्हणवणार्‍या भ्रष्ट अधिकार्‍यांचे सल्ले कारणीभूत असल्याची चर्चा वाळू तस्कर व परिसरातील जनतेमधून केली जात आहे.

लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, पतपेढ्या, सोसायटी यात कुठेही मागे न राहणार्‍या आणि सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांना निवडणुका लढविण्यासाठी पैसा उभारावा लागतो. मग यासाठी त्यांनी काही ‘इन्कमसोर्स’ डेव्हलप केले आहेत. त्यात वाळूचे ठेकेदार हे जवळपास सर्वच राजकारण्यांना आणि महसूल विभागाला खासगी वसुलदारामार्फत महिन्याकाठी मलिदा पुरवित असल्यामुळे या ठेकेदारांच्या व खासगी वसुलीदारांच्या मुसक्या आवळणार तरी कोण, हा संशोधनाचा विषय आहे .

माण, कोरडा, अफ्रुका, बेलवण नद्या तसेच मोठे ओढे सांगोला तालुक्यात आहेत. या नद्यांवर व ओढ्यांवर तालुक्याचा विकास अवलंबून आहे. तसे पाहिले तर तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती. या नद्या व तळ्यांमुळे या प्रांतातील शेती बहरत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आणि प्रशासनाला नैसर्गिक आपत्तींसह अवैध वाळू वाहतुकीने जेरीस आणले आहे. एकीकडे या अवैध वाळू उत्खननामुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे, त्यामुळे शेतीसाठी पाणी कमी पडू लागले आहे. तर, दुसरीकडे या नदीतील वाळू वाहतुकीमुळे अनेकांचा अपघात होत आहे. ही वाहतूक अवैध असल्याने या वाहनांवरील चालकांचा वेगावर ताबा नसतो. शिवाय प्रत्येक चौकातील महसूल विभागाच्या कर्मचार्‍याशी ठेकेदाराचे लागेबंधे असल्याने तेही कधी यांच्यावर कायद्याचा बडगा उगारत नाहीत. त्यामुळे हावरटासारखे नद्यांना पोखरणार्‍या वाळूमाफियांना आणि त्यांच्यावर वरदहस्त असणार्‍यांच्या मुसक्या आवळण्याची वेळ आता आली आहे.

कोरडा व माण नदीतील वाळूची प्रत चांगली असल्याने सोलापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यांत या वाळूला मोठी मागणी आहे. त्यामुळे कोरडा व माण नदी पात्रात अवैध वाळू उत्खननाचे प्रमाणही अधिक आहे. मात्र, या उत्खननाला कोणतीही सीमा नसल्याने आजमितीस नदीपात्रात मोठमोठे डोह तयार झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी मोठी दुघर्टना घडू शकते. अधिक वाळू उपशामुळे आव्हरलोड वाहने रस्त्यावर भरधाव वेगात धावत असतात. वेळेत माल पोहोचविणे आणि रात्री व दिवसाकाठी जास्तीत जास्त ट्रिप मारण्याच्या प्रयत्नात चालक बेफाम वेगात वाहन चालवितात. यामुळे ब्रेक फेल होणे, वळणावर वाहनाचा ताबा सुटणे, ओव्हरटेक करताना समोरच्या वाहनाला धडक देणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यात चिंतेची बाब म्हणजे या अवैध वाळू वाहतुकीत वापरली जाणारी वाहने ही कालबाह्य असतात. कुणाचीही भीती नसल्याने वाळूमाफिया रात्रभर नदीत हैदोस घालत असतात. आधीच अवैध त्यात ओव्हरलोड वाहतुकीमुळे तालुक्यातील सर्व रस्त्यांची वाट लागली आहे. रस्ता तयार करण्यासाठी आला नसेल इतका खर्च आता दुरुस्तीसाठी लागणार, अशी अवस्था झाली आहे. जिल्हा महसूल प्रशासन, पोलिस आणि ग्रामपंचायतीमध्ये नेमण्यात आलेल्या समितीचे या वाळूमाफियांशी लागेबंधे असल्यामुळे हा अवैध व्यवसाय दिवसेंदिवस भरभराटीस येत आहे. मलिदा पुरवित असल्यामुळे या ठेकेदारांना कोणताही त्रास होणार नाही, याची ते पुरेपूर काळजी घेतात.

भरमसाठ आर्थिक व्यवहारातून या वाळूतस्करीला तलाठी, सर्कल, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागातील अधिकारीच पाठबळ देत असल्याची चर्चा नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. येणार्‍या काळात नद्यांच्या परिसरात राहणारे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे .

छोट्या वाहनांतून वाळू चोरी…

सांगोला तालुक्यातील नदी परिसरात छोटा हत्तीसारख्या चारचाकी मालवाहतूक करणार्‍या छोट्या-छोट्या वाहनांमधून 1 ब्रास वाळूची वाहतूक करून दहा ते पंधरा हजार रुपयांना ब्रास या दराने विकली जात आहे. या परिसरात ट्रॅक्टर, ट्रक यांसारख्या मोठ्या वाहनातून होणार्‍या वाळू चोरीचा जमाना बदलून वाळू तस्करीला आता छोट्या हत्तीचे बळ मिळाले आहे, अशी चर्चा सर्वसामान्य जनतेतून पुढे येत आहे.

 

Back to top button