डिसले गुरुजींना अखेर ५ महिन्यांची रजा मंजूर | पुढारी

डिसले गुरुजींना अखेर ५ महिन्यांची रजा मंजूर

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

ग्लोबल टीचर अ‍ॅवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेला शिष्यवृत्तीकरिता जाण्यास अखेर पाच महिन्यांची रजा मंजूर करण्यात आली. रविवारी सुट्टीदिवशी शिक्षण विभागाने तत्काळ त्यांना रजा मंजुरी आदेश दिले.

ते 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत अमेरिकेत फुलब्राईट फॉरेन स्कॉलरशिप बोर्डात शिष्यवृत्तीअंतर्गत अध्ययन करणार आहेत. यामुळे शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या त्यांच्या रजेच्या वादावर अखेर पडदा पडला.

मूळचे बार्शीतील डिसले हे परितेवाडी (ता. माढा) येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नुकताच क्यूआर कोडच्या माध्यमातून शिक्षणाच्या तंत्रज्ञानाचा शोध लावला. त्याबद्दल त्यांना ग्लोबल टीचर हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सात कोटी रुपयांचा पुरस्कारही मिळाला आहे.

दरम्यान, डिसले गुरुजी यांना नुकताच अमेरिकेच्या फुलब्राईट या बोर्डाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

Back to top button