सोलापूर : दारूच्या नशेत पत्नीचा लाकडाने मारून खून | पुढारी

सोलापूर : दारूच्या नशेत पत्नीचा लाकडाने मारून खून

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : कळमण (ता. उत्तर सोलापूर) येथे घरगुती भांडणावरून दारूच्या नशेत पती मैनोद्दीन अब्बास शेख (वय 60, रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर) याने पत्नी लतिफा (वय 55) हिचा लाकडाने मारहाण करून खून केला. याप्रकरणी मैनोद्दीन याच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे निरीक्षक अरुण फुगे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी, कळमण गावात मैनोद्दीन हा पत्नी लतिफा, मुलगा व सून यांच्याबरोबर राहात होता. 14 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मैनोद्दीन याचे पत्नी लतिफा हिच्याबरोबर घरगुती कारणावरून भांडण झाले. त्यानंतर मैनोद्दीन हा घराबाहेर गेला.

तो दारू पिऊन पुन्हा घरी आला. त्यावेळी त्याने लतिफा हिला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यातून वाद वाढत गेला व दारूच्या नशेत मैनोद्दीन याने लतिफाला लाकडाने बेदम मारहाण केली. सासू लतिफाला मारहाण होत असताना सून यास्मिन शेख हिने तिला सासरा मैनोद्दीन याच्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला. पण मैनोद्दीनने तिला शिवीगाळ करून घरातून बाहेर जाण्यास सांगितले. तसेच तिलासुध्दा मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून यास्मिन ही घराबाहेर गेली. तिने पती समीर शेख याला फोन करून घडला प्रकार सांगितला.

या दरम्यान डोक्यात वर्मी घाव बसल्याने लतिफा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. तिची हालचाल बंद झाल्याचे लक्षात येताच मैनोद्दीन याने तेथून पळ काढला.

आईला मारहाण झाल्याचे समजताच समीर हा तत्काळ घटनास्थळी धावला. त्याने गंभीर जखमी लतिफाला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना लतिफाचा रात्री मृत्यू झाला.

याप्रकरणी यास्मिन हिने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून सासरा मैनोद्दीन शेख याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर करीत आहेत.

Back to top button