सोलापूर : माजी महापौरांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा | पुढारी

सोलापूर : माजी महापौरांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : खोटा सात-बारा उतारा सादर करून त्याद्वारे माजी महापौर विठ्ठल जाधव यांच्यासह आठजणांनी चार प्लॉटची खरेदी केली. तसेच त्यावर स्वतःचे नाव लावून फसवणूक केल्याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात चार वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत मंडल अधिकारी चंद्रकांत काशीनाथ हेडगिरे (वय 49, रा. शिवरत्ननगर, प्लॉट नं. 81/82, सरदार निवास, वसुंधरा कॉलेजजवळ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

विठ्ठल करबसू जाधव, सोमनाथ विठ्ठल जाधव, सुखदेव भीमा राठोड, सिद्धप्पा हणमंतप्पा गट्टे, भीमराज कुळाजी परमार, परशुराम मरगू जाधव, तत्कालीन तलाठी व मंडल अधिकारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, सन 2004 ते 2007 या कालावधीत जुना सर्व्हे नं. 362/अ,1/1 ब त्याचा नविन सर्वे नं. 622/अ,1/1 ब टीपी नं. 4 प्लॉट नं. 102 ते 105 या प्लॉटचा सुखदेव राठोड व विठ्ठल जाधव यांनी तत्कालीन तलाठी व मंडल अधिकार्‍याच्या मदतीने बनावट सातबारा तयार केला. या बनावट सातबार्‍याच्या आधारे सुखदेव राठोड याच्याकडून विठ्ठल जाधव यांनी दस्त क्र. 6268/2004 प्रमाणे सहायक निबंधक वर्ग 2 उत्तर सोलापूर यांच्या कार्यालयात रजिस्टर खरेदी खत लिहून घेतले. त्यानंतर विठ्ठल जाधव यांनी त्या प्लॉटच्या सातबार्‍यावर स्वतःचे नाव लावून तलाठी व मंडल अधिकार्‍याच्या मदतीने शासनाची फसवणूक केली.

दुसर्‍या गुन्ह्यात जुना सर्वे नं. 362/अ,1/1 ब त्याचा नवीन सर्वे नं. 622/अ,1/1 ब टीपी नं. 4 प्लॉट नं. 121 ते 128 ची खरेदी दस्त क्र. 5252/2007 प्रमाणे करून नाव लावून घेतले. तिसर्‍या गुन्ह्यात जुना सर्वे नं. 362/अ,1/1 ब त्याचा नवीन सर्वे नं. 622/अ,1/1 ब टीपी नं. 4 प्लॉट नं. 109 ते 113 या प्लॉटची खरेदी दस्त क्र. 6843/2005 प्रमाणे खरेदीखत करून नाव लावून घेतले.

चौथ्या गुन्ह्यात जुना सर्वे नं. 362/अ,1/1 ब त्याचा नवीन सर्वे नं. 622/अ,1/1 ब टीपी नं. 4 प्लॉट नं. 81 ते 85 या प्लॉटची खरेदी कुलमुखत्यार परशुराम जाधव यांच्याकडून खरेदी घेतलेली असताना फेरफार क्र. 22686 यावर उपरी लेखन करून प्लॉट नं. 58 ते 61 व 65 ते 67 अशा 7 प्लॉटची ज्यादा नोंदी लावून शासनाची फसवणुक केली. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात मंडल अधिकारी हेडगिरे यांच्या फिर्यादीवरुन चार गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक मळाळे पुढील तपास करीत आहेत.

Back to top button