सोलापूर : अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांचे २० कोटी थकले; दुसर्‍या टप्प्यातील निधीकडे शेतकर्‍यांचे लक्ष | पुढारी

सोलापूर : अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांचे २० कोटी थकले; दुसर्‍या टप्प्यातील निधीकडे शेतकर्‍यांचे लक्ष

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर 2021 मध्ये अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या (अतिवृष्टीबाधित शेतकरी) बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माढा आणि मोहोळ तालुक्यातील शेतकर्‍यांना राज्य शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा दुसरा टप्पा अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे आता दुसर्‍या टप्प्याकडे लक्ष लागले आहे. दुसर्‍या टप्प्यातील जवळपास 20 कोटींची रक्कम शासनाकडे अद्यापही प्रलंबित आहे. या मदतीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील शेतकरी आहेत. त्यामुळे दुसरा हप्ता कधी मिळणार, अशी विचारणा आता सातत्याने केली जात आहे.

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा जिल्ह्याला मोठा तडाखा बसला होता. यात बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माढा आणि मोहोळ तालुक्याला सर्वाधिक फटका बसला होता. उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. याचे पंचनामे करून बाधित 79 हजार 440 शेतकर्‍यांना शासन निकषांनुसार 80 कोटी रुपये मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शासनाला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार शासनाने पहिल्या टप्प्यात 75 टक्के म्हणजेच 60 कोटी रुपये वितरित केले होते. तेव्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही रक्‍कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होण्यास विलंब लागला होता.

दुसर्‍या टप्प्यातील उर्वरित 20 कोटी अजूनही मिळाले नाहीत. जिरायत शेतकर्‍यांसाठी हेक्टरी दहा हजार रुपये, बागायतीसाठी हेक्टरी पंधरा हजार आणि फळ पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 25 हजारांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नुकसानीच्या मानाने मिळणारी मदत तोकडी असली तरी तीही वेळेवर मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या भावना तीव्र आहेत. ‘राजा उदार झाला अन् भोपळा हाती आला’, अशीच अवस्था सध्या तरी शेतकर्‍यांची झाली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button