सोलापूर : आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून भामट्याचा महिला डॉक्टरला गंडा | पुढारी

सोलापूर : आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून भामट्याचा महिला डॉक्टरला गंडा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी डिपॉझिट ट्रान्स्फर करण्याच्या बहाण्याने सोलापुरातील महिला डॉक्टरला 1 लाख 74 हजार रुपयांना गंडा घातला. आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून एका भामट्याने हे कृत्य केले. याप्रकरणी डॉ.प्रियांका मारूती करडे (वय 33, रा. घर नं. 64, सुरवसे मित्र नगर, आसरा चौक, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मोबाईल क्र. 9395469320 धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत डॉ. प्रियंका यांनी फिर्यादीत म्हटले आहे, त्यांचा पुणे येथील वडगाव शेरी येथे फ्लॅट आहे. तो भाड्याने द्यावयाचा होता. दरम्यान, गेल्या 8 जानेवारी रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास डॉ. प्रियांका या वडिलांसमवेत दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांना मोबाईलवर फोन आला. त्यामुळे त्यांनी दुचाकी चार पुतळा समोरील मोकळ्या जागेत थांबविली. त्यांनी मोबाईल पहिला असता त्यांच्या मोबाईलवर मोबाईल क्र. 9395469320 च्या धारकाने कॉल करून आपले नाव विकास राजनाथ पटेल असून, आर्मी ऑफीसर असल्याचे सांगितले. तथाकथीत आर्मी ऑफीसर विकास पटेल याने डॉ. प्रियंका यांच्याशी चर्चा केली. तसेच फ्लॅटसंदर्भात आपल्या वडिलांशी बोलणे झाल्याचे स्पष्ट केले.

त्यानुसार फ्लॅट भाड्याने घ्यायचा आहे. तुम्हाला डिपॉझिट ट्रान्सफर करायचे आहे. त्याकरीता तुम्ही 90 हजार रुपये पाठवा. मी तुम्हाला परत रक्क्म ट्रान्सफर करतो, असे सांगितले. त्यामुळे डॉ. प्रियंका यांनी त्याला दोन वेगवेगळ्या खात्यांतून 1 लाख 74 हजार रुपयांची रक्‍कम ट्रान्सफर केली.

त्यानंतर डॉ. प्रियांका यांना काही डिपॉझिटची रक्कम मिळाली नाही. परंतु जेव्हा त्यांनी संबंधित खाती आणि मोबाईल क्रमांक तपासले तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील पोलिस नाईक कामूर्ती पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : राजर्षी छ. शाहू महाराज आणि एका शेणीवालीची गोष्ट

Back to top button