सोलापूर : सिद्धेश्‍वर यात्रेत आज ‘यन्‍नीमंजन’; मध्यरात्री चढविला साज, निर्बंधामध्ये होणार महायात्रा - पुढारी

सोलापूर : सिद्धेश्‍वर यात्रेत आज ‘यन्‍नीमंजन’; मध्यरात्री चढविला साज, निर्बंधामध्ये होणार महायात्रा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर महायात्रेस बुधवारपासून (दि. 12) प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये मानाच्या नंदीध्वजांना साज चढविण्यात आला. बुधवारी सकाळी हिरेहब्बू वाड्यातून मानाचे नंदीध्वज सिद्धेश्‍वर मंदिरात येणार आहेत. तेथून प्रातिनिधिक स्वरूपातील मानकरी व प्रतीकात्मक नंदीध्वज हे 68 लिंगांच्या ‘यन्‍नीमंजन’ (तैलाभीषेक) निघणार आहेत. यावेळीही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी होऊ नये, म्हणून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.

या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी दुपारी शहर पोलिस दलातील अधिकार्‍यांकडून सिद्धरामेश्‍वर मंदिराची पाहणी करण्यात आली. यावेळी भक्‍तांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी मंदिरातील ‘दासोह’ (अन्‍नछत्र) बंद करण्याच्या सूचना दिल्या. यावर मंदिर प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घेऊ, असे पोलिस प्रशासनास कळविले आहे.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या महायात्रेस बुधवारपासून तैलाभिषेकाने सुरुवात होणार आहे. यावर्षीही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्यावर्षी प्रातिनिधिक स्वरूपात यात्रा होत आहे. याबद्दल मानकरी व भक्‍तांमधून याबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. पोलिस आयुक्‍त हरिश बैजल यांनी 12 जानेवारी रात्री 12 वाजल्यापासून ते 16 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत सिध्देश्‍वर मंदीर व आजूबाजूच्या परिसरामध्ये संचारबंदी जाहीर केलेली आहे.

त्यामुळे मंगळवारी दुपारी आयुक्‍तालयातील विभाग 1 चे सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. संतोष गायकवाड, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्यासह विशेष शाखेच्या पोलिसांनी मंदीर व आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. यावेळी मंदीर समितीकडून देण्यात येणार्‍या डिजीटल पास यंत्रणेचीही पोलिस विभागाकडून पाहणी करण्यात आली.

याप्रसंगी मंदिरात भाविकांना कशा पध्दतीने सोडावे, कोठून बाहेर पडावे तसेच गर्दी होणारे ठिकाण म्हणजे मंदीरातील अन्नछत्र हे या कालावधीत बंद ठेवावे याबाबत मंदीर समितीला सूचना दिल्या. यावर मंदीर समितीने याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे पोलिसांना कळविले आहे.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : Molnupiravir कोव्हिड-19 वरील पहिलं औषध | औषधाबद्दल नेमका वाद आणि साईड इफेक्ट

Back to top button