

सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील महिला क्लार्कवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली. 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. वैशाली शंकर माने (वय 40, रा. क्षेत्रमाहुली ता. सातारा) असे महिलेचे नाव असून सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे निवृत्त शिक्षक आहेत. तक्रारदार यांचे 24 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण असलेला निवड श्रेणी प्रस्ताव माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी तक्रारदार निवृत्त शिक्षक क्लार्क असलेल्या वैशाली माने यांना भेटले. मात्र, माने यांनी ‘साहेबांना देण्यासाठी म्हणून 25,000 लाचेची मागणी केली.’ लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.
एसीबी विभागाने तक्रार दाखल केल्यानंतर दि. 27 ऑक्टोबर रोजी पडताळणी केली असता लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले. लाचेची रक्कम दि. 28 रोजी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने ट्रॅप लावला. मंगळवारी रोख रक्कगम स्वीकारत असताना एसीबीने रंगेहाथ कारवाई केली. दुपारी ही कारवाई झाल्यानंतर जिल्हा परिषदेसह साताऱ्यात खळबळ उडाली. दरम्यान, सातारा शहर पोलिस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. सातारा शहरासह जिल्ह्यात शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.