

सातारा : संगमनगर सत्यमनगर येथील घरातून चोरीस गेलेल्या साडे सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत केले असून, संबंधित महिलेस ताब्यात घेतले.
संगमनगर सत्यमनगर येथील कल्पना सोनावणे यांच्या घरातील कपाटातून दि. 21 ऑक्टोबर रोजी सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. चोरी झाल्याने घरातील लोकांकडे चौकशी सुरु होती. मात्र घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी एक महिला येत होती तिच्याकडेही चौकशी सुरु होती. गुन्ह्यामध्ये तांत्रिक पुरावा मिळून येत नसल्याने तपास क्लिष्ट झाला होता.
परंतु गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकांने स्वयंपाक करणार्या महिलेवर वॉच ठेवला होता. दिवाळीची सुट्टी असल्याने ती सांगली येथे गेली होती. पोलिस तपास करत असताना महिलेबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने महिलेकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. माझ्यावर विनाकारण चोरीचा आरोप केला जात आहे. बेशुद्ध पडल्याचे नाटक करून तपासात सहकार्य दाखवत नव्हती. पोलिसांनी तिच्याकडे कसोशीने चौकशी सुरू केली असता तिने चोरीची कबुली दिली.
चोरी केलेले सोन्याचे गंठण, सोन्याचा हार, मणिमंगळसूत्र असे सुमारे 6 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तिने पोलिसांना दिले व ते दागिने पोलिसांनी जप्त केले. चोरीतील 100 टक्के मुद्देमाल हस्तगत केल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के व पथकाचे वरिष्ठ अधिकार्यांनी अभिनंदन केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि श्याम काळे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, सुशांत कदम यांनी केली.