सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातार्यास पाणीपुरवठा करणार्या शहापूर तसेच कास पाणी योजनेस होणारा वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने तांत्रिक दुरूस्ती करण्यात येणार आहे. तसेच कास पाणी योजनेच्या नवीन जलवाहिनी कामांमुळे जुन्या जलवाहिन्यांना झालेली लिकेज काढण्यासाठी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस वेगवेगळ्या भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय सातारा पालिका प्रशासनाने घेतला आहे.
पहा कोणत्या भागात कधी पाणी नाही...
सोमवारी कास माध्यमातून भरण्यात येणारी भैराबा टाकी व शहापूर योजनेतून भरण्यात येणारी यशवंत गार्डन पाणी टाकीतून केला जाणारा पाणीपुरवठा बंद असेल.
मंगळवारी कास माध्यमातून भरण्यात येणारी व्यंकटपुरा टाकी व परिसर तसेच शहापूर योजनेवरील घोरपडे टाकीचा दुपार सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
बुधवारी कास योजनेवरील कात्रेवाडा टाकी व घंटेवारी तसेच शहापूर योजनेवरील गणेश टाकी, गुरूवार टाकी व पंपिंग लाईन बंद राहणार असल्याने संबंधित भागास पाणीपुरवठा होणार नाही.
गुरूवारी कास योजनेवरील गोल टाकी मेन लाईन (निळी) दुसरा झोन सकाळी 7 ते सकाळी 8 वाजता होणारा पाणीपुरवठा तसेच शहापूर योजनेवरील राजवाडा टाकीतून होणारा पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे.
शुक्रवारी कास योजनेवरील मेन लाईन गोल टाकी (निळी) पहिला झोन सकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत होणारा पाणीपुरवठा तसेच शहापूर योजनेवरील गणेश टाकीतून दुपार सत्रात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शनिवारी कास योजनेवरील कोटेश्वर टाकी तसेच शहापूर योजनेतून भरण्यात येणारी बुधवार टाकी (सकाळ सत्र), देवी चौक घंटेवारी बंद राहणार आहे.
रविवारी कास योजनेवरील खापरी लाईन, गुजर आळी तसेच गुरूकूल टाकीवरून होणारा पाणीपुरवठा तसेच शहापूर योजनेवरील घोरपडे टाकीतून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शहापूरच्या माध्यमातून पाणी वितरण होणार्या भागातील नागरिकांना शेंद्रे सबस्टेशन येथून वीजपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे अपुरा पाणीपुरवठा, पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, रायझिंग मेनमध्ये लिकेज असे प्रकार होत आहेत. त्यामुळे सातारा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. कास उद्भव योजनेतून सातारा शहरास पाणीपुरवठा करणार्या नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे जुन्या जलवाहिनीचे काही ठिकाणी लिकेज होत आहे. त्यामुळे या योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याने काही भागास अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत वितरण व्यवस्थेची तांत्रिक दुरूस्ती तसेच पाईपलाईन दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही योजनांसाठी 16 ऑगस्टपासून एक दिवस शटडाऊन घेण्यात आला आहे.
दुरूस्तीची कामे झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात स्वतंत्र आदेश दिले जाणार आहेत. संबंधित नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.