

वेलंग : एकेकाळी दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे व शिवछत्रपतींचा वारसा लाभलेले ऐतिहासिक वाई शहर आज समस्यांच्या दलदलीत अडकले आहे. ऐतिहासिक वेस ढासळू लागली आहे. महागणपती मंदिराची अस्वच्छता, पुरातन दगडी घाटांचे न झालेले जतन आणि ढासळती मंदिरे हे सर्व पाहता आज वाईचा वैभवशाली वारसा केवळ कागदावरच उरला आहे. काही संवेदनशील नागरिक व संस्थांंच्या प्रयत्नांमुळेच या घाटांचे सौंदर्य अजूनही थोडेफार टिकून आहे. पण बाकी सर्वत्र प्रशासनाची निष्क्रियता जाणवते.
वाईची ओळख चित्रपटसृष्टीत आणि धार्मिक वारशात मोठी असली तरी विकास या नावाखाली भ्रष्टाचार आणि बेदरकार कारभाराने या शहराचे रूप विद्रूप केले आहे. शहरातील शिवकालीन ऐतिहासिक वेस आज शेवटच्या घटका मोजत आहे. त्या वेशीला लागलेला प्राचीन लाकडी दरवाजा अजूनही शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. पण या वारशाकडे कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता किंवा प्रशासकीय अधिकारी डोळसपणे पाहत नाही.
निवडणुका आल्या की विकासाचे गाजर दाखवले जाते. पण नागरिकांच्या मूलभूत गरजा मात्र अद्याप अधांतरीच आहेत. वाई शहराला खरोखरच स्मार्ट बनवायचे असेल तर केवळ योजना नव्हे तर दूरदृष्टी असलेला जबाबदार आणि शहराच्या वारशाबद्दल जागरूक असा नगराध्यक्ष निवडून देणे अत्यावश्यक आहे.
पुरातन काळातील दगडी बुरुज फोडला...
अलीकडेच सेवरेज लाईनच्या कामादरम्यान पुरातन काळातील दगडी बुरूज फोडण्यात आला. ब्राह्मणशाही घाटावर हा प्रकार ठेकेदाराने केला, मात्र त्यावर कुणीही ब्र शब्द काढला नाही. हेरिटेज शब्द फक्त भाषणात झळकतो, मात्र हा दर्जा टिकवण्यासाठी काहीच केले जात नसल्याचे वास्तव दिसून येते.