

उंब्रज : उंब्रज ता. कराड येथील पाटण तिकाटणा येथे चालत्या मोटारसायकलने अचानक पेट घेतल्याने आगीच्या भीतीने मोटरसायकलस्वाराने मोटरसायकल सोडून पळ काढला. यावेळी उपस्थित नागरिकांनी तसेच सातारा येथील संदीप फायर सर्व्हिसने फायर सिलेंडरच्या सहाय्याने मोटरसायकलला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटरसायकल जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोमवार दि. 14 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, आज आठवडा बाजारचा दिवस असल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवार आठवडी बाजाराचा दिवस असल्याने पाटण तिकाटणा येथे दुपारच्या सुमारास बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी झाली होती. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास चरेगावहून उंब्रज येथे बाजारपेठेत जाणारी मोटरसायकल पाटण तिकाटणा येथील सबवेमध्ये आली असता मोटरसायकलने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच मोटरसायकलस्वाराने मोटरसायकल सोडून पळ काढला. यावेळी स्थानिक नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले होते.
या दरम्यान, सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यामध्ये सातारा येथून पाटण दिशेला जाणारी संदीप फायर सर्व्हिसची गाडी वाहतूक कोंडीत अडकली होती. वाहतूक कोंडी का झाली आहे हे पाहण्यासाठी आलेल्या चालकाला मोटरसायकल पेटलेली दिसली असता क्षणाचाही विचार न करता त्यांनी फायर सिलेंडरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र टायरांनी पेट घेतल्याने मोटरसायकल जळून खाक झाली. घटनेची माहिती उंब्रज पोलिसांना समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.