

ढेबेवाडी : तळमावले (ता. पाटण) परिसरात घरात घुसून वयोवृद्ध व्यक्तींसह महिलांना संमोहित करत पैसे व दागिने लुटण्याचा दोघा संशयितांकडून प्रयत्न केला जात असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या दोन्ही संशयितांना कपडे फाटेपर्यंत स्थानिकांनी चोप दिला आहे. मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली नसल्याने अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
ढेबेवाडी परिसरातील तळमावले विभागात दोन व्यक्ती घरोघरी जाऊन महिला तसेच वयोवृद्घांची भेट घेत होते. दोन्ही व्यक्ती लोकांना विशेषतः महिलांना संमोहित करून घरातून दागिने व पैसे आणा असे सांगत होते आणि एका व्यक्तीकडून चार हजार रूपये घेताना रंगेहाथ सापडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी दोन्ही संशयितांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. दोन्ही व्यक्ती बारामती परिसरात असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी या घटनेची नोंद मंगळवारी रात्रीपर्यंत ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली नव्हती.