बामणोली : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे दि. 5 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा-कास रस्त्यावर पोलिसांनी पर्यटक कास तलाव, वजराई धबधबा, एकीव धबधबा परिसरात जावू नये यासाठी बंदोबस्त ठेवला. यावेळी पोलिसांकडून वाहने अडवून पुन्हा परत जाण्याच्या सूचना पर्यटकांना केल्या. तसेच या आदेशामुळे कास परिसरातील हॉटेल चालकांनीही आपले हॉटेल्स बंद ठेवून या आदेशाचे पालन केले. त्यामुळे वीकेंडलाही कास परिसरात शुकशुकाट झाला होता.
पावसाळी वातावरणामुळे कास तलाव, वजराई धबधबा, एकीव धबधबा परिसरात गर्दी होते. शनिवार, रविवार सलग सुट्ट्यांचे दिवस असल्याने या ठिकाणी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेवून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकीव धबधबा या ठिकाणी मेढामार्गे कुसुंबी ते कोळघर रस्त्यावरून जाता येते. तर सातार्याहून पारंबे फाटा येथून जाता येते. या दोन्ही मार्गावरून या ठिकाणी पर्यटकांना जाता येवू नये, यासाठी बॅरिकेटिंग करून हा रस्ता बंद करण्यात आला.
तसेच कास तलाव परिसरात गर्दी होवू नये, यासाठी बुकिंग व बामणोली मुक्कामी असणार्या वाहन चालकांनाच सोडले जात होते. या परिसरातील हॉटेल व्यवसायिकांनाही जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची विनंती केल्यानंतर हॉटेल व्यवसायिकांनी हॉटेल बंद केले. तसेच नाष्टा व इतर दुकानेही बंद असल्याचे चित्र दिसून आले. जावली पोलिसांकडून पठार परिसरात प्रत्येक वाहन अडवून चौकशी केली जात होती. जे पर्यटनासाठी येत होते त्यांना माघारी जाण्याच्या सूचना केल्या जात होत्या. कास परिसरातील पर्यटनस्थळांवर 4 पोलिस हवलदार व त्यांच्या मदतीला 6 होमगार्ड असा 10 कर्मचार्यांचा स्टाफ वॉच ठेवत आहे.