सातारा : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. दि. 7 ते 17 सप्टेंबर अखेर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता सातारा-स्वारगेट मार्गावर दर 15 मिनिटाला जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच 56 जादा बसेसमधून प्रवासी व गणेशभक्तांची वाहतूक केली जाणार आहे.
दि. 7 ते 17 सप्टेंबर या कालावधीत गौरी, गणपती उत्सव असल्याने दि. 4 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावर प्रवाशी व गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याच्या द़ृष्टिकोनातून व प्रवाशांना अधिक चांगली सेवा पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव, खंडाळा, फलटण, कोरेगाव, वडूज, दहिवडी, मेढा या 11 आगारांतील सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.
सातारा-स्वारगेट विना वाहक विना थांबा या मार्गावर दि. 15 मिनिटाला जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. सुमारे 56 बसेसच्या फेर्या होणार आहेत. तसेच सर्व जादा फेर्या संगणकीय आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.जादा बसेस स्वारगेट-सातारा, सातारा-स्वारगेट, स्वारगेट-कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण मार्गांवर धावणार आहेत. या बसेसशिवाय प्रवाशांच्या गर्दीनुसार मुंबई,बोरीवली, ठाणे, पुणे, सोलापूर मार्गावरही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
सातारा विभागातून गौरी-गणपती जादा वाहतुकीसाठी सुमारे 248 जादा बसेस ठाणे विभागास देण्यात येणार आहेत. त्यानुसार सातारा 27, कराड 27, कोरेगाव 22, फलटण 27, वाई 22, पाटण 22, दहिवडी 21, महाबळेश्वर 19, मेढा 22, पारगाव-खंडाळा 17, वडूज 22 अशा जादा बसेस कोकणात जाणार आहेत.