Diwali 2025: साताऱ्यात अवतरली चंदेरी, सोनेरी दुनिया

धडामधूम वातावरणात लक्ष्मीपूजन : दीपोत्सवाला जिल्ह्यात उधाण
Diwali 2025: साताऱ्यात अवतरली चंदेरी, सोनेरी दुनिया
Published on
Updated on

सातारा : लक्ष लक्ष दिव्यांचा प्रकाश, विविधरंगी आकाश कंदील, आकर्षक रांगोळ्या, फटाक्यांची जोरदार आतषबाजी अशा मंगलमय वातावरणातील दीपोत्सवाला मंगळवारी जल्लोषाचे स्वरूप आले. आकाशात विविधरंगी फटाके फुटताना साताऱ्यात अक्षरश: चंदेरी, सोनेरी तेजाची दुनियाच अवतरली. फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत व धडामधूम वातावरण लक्ष्मीपूजन पार पडले. अवघ्या शहरभर झालेली फटाक्यांची विविधरंगी आतषबाजी लक्षवेधक ठरली.

वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा (पाडवा) आणि भाऊबीज या सहा सांस्कृतिक विचारधारा असलेल्या सणांचा दिवाळी हा उत्सव. दिवाळी या एकाच शब्दात जीवनाचं सार, मांगल्य सामावलं असून पणत्याचं तेज, कंदिलाची शोभा, रांगोळ्यांचं सौंदर्य, आकाशातली रोषणाई अशा मनमोहक वातावरणाने आसमंत उत्साहाने भरून गेला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशीनंतर मंगळवारी लक्ष्मीपूजनाने साताऱ्यासह अवघ्या जिल्ह्यात दीपोत्सवाला खऱ्या अर्थाने उधाण आले. बच्चे कंपनीनेही पहाटेपासून फटाके फोडत दिवाळीचा आनंद लुटला. नरकचतुर्दशीला बोगद्यानजीक असणाऱ्या कुरणेश्वर येथील गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केली होती. पहिल्या अभ्यंगस्नानाला अनेकांची कुरणेश्वर वारी चुकत नाही. हाच उत्साह मंगळवारीही सर्वत्र पहायला मिळाला.

लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळीत व्यापारी वर्गासाठी तसेच घरगुती पूजनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. त्यामुळे सकाळपासूनच घरोघरी लक्ष्मीपुजनाची लगबग सुरू होती. व्यापारी, विविध संस्था व नागरिकांनी विविध मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले. सातारा शहरातील मोतीचौक, राजवाडा, राजपथ, कमानी हौद, सदाशिव पेठ, खणआळी, सम्राट चौक, शनिवार चौक, देवी चौक, पोवईनाका, रविवार पेठ परिसरातील व्यापाऱ्यांनी सायंकाळी लक्ष्मीपूजन केले. त्यावेळी नव्या चोपड्या, हिशोब वह्या, दैनंदिनी यांचे विधीवत पूजन केले. त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांसह आकाशाचा वेध घेत उंच उडणारे रंगीबेरंगी फटाके सारा आसमंत उजळून टाकत होते. घरोघरी नागरिकांनी थाटात व उत्साहात लक्ष्मीपूजन केले. बाजारपेठेत लक्ष्मीपूजन सोहळा साजरा होत असताना काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

दरम्यान, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शहर परिसरातील बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. टिव्ही, फ्रिज, इलेक्ट्रिक शेगडी, संगणक, मोबाईल हॅण्डसेट, इलेक्ट्रिक साहित्य, कपडे अन्य वस्तूंची खरेदी नागरिकांनी केली.

दिवाळीत सोने खरेदी करण्यावर विशेषत: महिलांचा भर असतो. विविध नामांकित ज्वेलर्सच्या दुकानामध्ये रात्री उशीरापर्यंत गर्दी होती. दिवाळीच्या गिफ्टस्‌‍ खरेदीसाठी स्वीटमार्ट, बेकरी, जनरल स्टोअर्समध्येही तुडूंब गर्दी होत आहे. गिफ्ट्ससाठी चॉकलेट, सुकामेवा, ड्रायफ्रुटस, बिस्किट बॉक्संना ग्राहकाकडून चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दिपावलीच्या पार्श्वभूमीवर दररोज बाजारपेठेत मोठी उलाढाल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news