

म्हसवड : म्हसवड, ता. माण येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला असून नवरात्र महोत्सवाला यावर्षी बुधवार दि. 22 ऑक्टोबर 2025 रोजी पारंपरिक धार्मिक विधींनुसार प्रारंभ होणार आहे. पहाटे 5.45 वाजता घटस्थापना करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 10.30 वाजता श्रींचा हळदी समारंभ पार पडणार आहे.
श्री सिद्धनाथ देवस्थानातील मुख्य पुजारी व सालकरी यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने घटस्थापना केली जात असून 12 दिवस चालणार्या या नवरात्र उत्सवाला लाखो भाविकांचा मोठा उत्साह लाभतो. नवरात्र काळात गुरव समाज, मानकरी व हजारो भक्त पहाटे माणगंगेच्या पात्रातून स्नान करून नगरप्रदक्षिणा घालतात. मंदिरातील काही पुजारी आणि भक्तगण या काळात अखंड उपासना करत ‘उभे नवरात्र’ पाळतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून अखंड सुरू आहे. दिवाळी मैदानाची सुरुवात गुरुवार दि. 23 ऑक्टोबर रोजी पारंपरिक वेशभूषेत मानकरी-सालकरी यांची मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात होणार आहे. तुळशी विवाह व श्रींचा शाही विवाह रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजता घट उठवले जातील आणि मध्यरात्री 12 वाजता श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा पारंपारिक विधीपूर्वक संपन्न होणार आहे. बुधवार दि.12 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता विशेष पूजन व आरतीचा कार्यक्रम होणार असून या दिवशी श्री काळभैरव पूजनासाठी म्हसवड शहरात भाविकांची मोठी गर्दी असते. श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी रथोत्सव शुक्रवार दि. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता देवदिवाळी निमित्त साजरा होणार आहे. या रथोत्सवाने नवरात्र आणि विवाह महोत्सवाची सांगता होणार आहे.