कोविड काळात जनतेचे प्राण वाचावेत यासाठी बंद पडलेले मायणी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. जवळच्या मित्रांकडून हातउसने पैसे घेऊन तब्बल साडेतीन कोटी कॉलेजमध्ये गुंतवले. आता याच मेडिकल कॉलेजच्या आडून मायणीतील देशमुख कुटुंबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझे राजकारण संपवण्यासाठी काहीजण मुळावर उठलेत. त्यांनी कितीही कुभांड रचले तरी शरद पवार आणि रामराजे यांच्यापुढे कधीच झुकणार नाही. रामराजे, पडद्यामागून गेम काय करताय, जातिवंत राजे असाल तर समोर येऊन लढा, असे आव्हान आ. जयकुमार गोरे यांनी सातार्यात पत्रकार परिषदेत दिले. मायणी मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून भ्रष्टाचार केल्याचा आरोप आणि ईडी नोटिशीवरून आ. गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या पुराव्यांच्या कागदपत्रांचा मोठा गठ्ठाच पत्रकारांसमोर सादर केला.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, मायणी मेडिकल कॉलेजमध्ये देशमुख कुटुंबीयांनी 680 विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये लुबाडले आहेत. बंद पडलेले कॉलेज पुन्हा सुरू करण्यासाठी देशमुख कुटुंबीय माझ्याकडे आले होते. या महाविद्यालयाच्या प्रकरणात आमच्या कुटुंबाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे देशमुखांनी तेव्हा सांगितले होते. त्यानंतरच मी या प्रकरणात लक्ष घातले. कोविडमध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचे पैसे थेट हॉस्पिटलच्या खात्यावर आले. त्याचा व माझा काडीचाही संबंध नाही. व्हा. चेअरमनपद संदीप देशमुखांकडे आहे. इन्शुरन्स कंपनीचा आरोग्य मित्र आणि देशमुख यांच्याकडे हे लॉगिन आयडी आणि पासवर्ड आहेत. हॉस्पिटलमध्ये जो झोल झाला आहे. तो या दोघांच्या संगनमतातून झाला आहे. कॉलेजच्या भानगडीत माझ्याकडे गयावया करणारे हेच देशमुख कुटुंब आता माझ्या विरोधात कोर्टात गेले आहेत. माझे विरोधक निवडणुका आल्या की अशा प्रकारांना खतपाणी घालतात, हे वेळोवेळी समोर आले, असेही आ. गोरे म्हणाले.
आ. गोरे पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मला जाणीवपूर्वक ‘व्हिलन’ ठरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. शरद पवारांनी राजकीय मुद्यांंवर माझ्या विरोधात लढा उभारला असता तरी समजून घेतले असते. रामराजे हे तर महान नेते आहेत. या प्रकरणात मला गोवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. स्वत:ला राजे म्हणवून घेणार्यांनी आपल्याला शोभेल असे कृत्य केले पाहिजे. मला विनंती केली असती तर कॉलेजमधून मी बाहेर पडलो असतो. मात्र चॅलेंज देऊन कोणी मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असेल तर मी सहज बाजूला जाणार नाही. मायणीच्या मेडिकल कॉलेजमध्ये माझा काडीचा स्वार्थ नाही. त्या कॉलेजची एक इंच जमिनीवरही मी हक्क सांगणार नाही. हे कॉलेज ट्रस्टच्या मालकीचे असून त्यावर धर्मादाय आयुक्तांचा पूर्ण अधिकार आहे, असेही आ. गोरे म्हणाले.
आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या आ. जयंत पाटील यांनी मेडिकल कॉलेजमधील 200 मृत लोकांची नावे घोषित करावी. ज्या हिम्मत देशमुखांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे, त्यांनी देखील ही यादी कोर्टापुढे सादर करावी. सांगली जिल्ह्यातील मांगले येथील सतीश पाटील यांनी मुलीच्या मेडिकल प्रवेशासाठी पेट्रोल पंपावर कर्ज काढून ते देशमुख यांना दिले होते. ते पैसे अडकले तसेच या कर्जासाठी बँकेने त्यांचा पेट्रोल पंप सील केला होता. ते आ. पाटील यांना दिसले नाही का? आ. पाटील हे वरुन गोंडस दिसत असले तरी ते आतून कटकारस्थानी आहेत, अशी टीकाही केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अरुण गोरे, निलेश माने, चिन्मय कुलकर्णी, शिवाजीराव शिंदे, सांगलीचे सतीश पाटील उपस्थित होते.
मायणी मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून 680 विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली. मान्यता नसतानाही एमबीबीएस प्रवेशासाठी 122 कोटी रुपये ढापले होते. या प्रकरणात देशमुखांनी दिलेले चेक बाऊन्स झाले. याच प्रकरणातून ईडीने देशमुख कुटुंबाची कस्टडी मागितली होती. ईडीचे पथक मायणीत माझ्यामुळे नाही, तर संबंधितांच्या कर्मामुळे आले होते. 2022 मध्येच ईडीने नोटिसा पाठविल्या होत्या. मात्र, त्याला योग्य उत्तर न दिल्यानेच ही कारवाई झाली आहे. तब्बल 146 पोलिस ठाण्यांमध्ये देशमुख कुटुंबीयांवर गुन्हे दाखल आहेत, असेही आ. गोरे म्हणाले.