

सातारा : भारतीय शैली कुस्ती महासंघ, राजेश्वर प्रतिष्ठान व क्रीडा महर्षी साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त दि. 20 ते दि.23 नोव्हेंबर या कालावधीत सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर 52 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकीन, रसिक व जनतेने या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे. यासाठी मी येत आहे, आपण सर्वांनीही यावे, असे आव्हान राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांनी केले.
हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून खा. शरद पवार यांना आयोजकांच्यावतीने दिलेले निमंत्रण त्यांनी स्वीकारले. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, राजेश्वर प्रतिष्ठान व दीपक पवार यांनी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेबद्दल अभिनंदन केले. बारामती येथे या स्पर्धेबद्दल मार्गदर्शन केले. राज्यातील तसेच देशातील येणारे सर्व प्रतिष्ठित पाहुणे, खेळाडू यांचे नियोजन चोख करावे, अशा सूचना देखील केल्या. या भेटीवेळी पैलवान चंद्रकांत सुळ, आबा सुळ, वैभव फडतरे, संदीप साळुंखे, माणिक पवार, राजेश्वर पवार, जीवन कापले, देवराज पवार, सुधीर पवार उपस्थित होते.
दरम्यान, हिंदकेसरी स्पर्धेत देशभरातील 26 राज्यांतून स्पर्धक तसेच सात सेना दलाचे संघ असे एकूण 500 पुरुष व 250 महिला सहभागी होणार आहेत. स्पर्धेत म्हणून महाराष्ट्रातून 30 तरे दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय दर्जाचे 80 पंच सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा खर्च आहे. सुमारे 55 लाखांची बक्षीसे साहेबराव पवार कुटुंबियांच्यावतीने दिली जाणार असल्याची माहिती दीपक पवार यांनी दिली. प्रथम क्रमांकाची हिंदकेसरी कुस्ती 85 ते 140 किलो वजन गटात होणार असून प्रथम विजेत्यास थार व चांदीची गदा, व्दितीय क्रमांकास बुलेट ही दुचाकी दिली जाणार आहे. या कुस्तीतील चुरस पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.