

तासवडे : साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तासवडे ग्रामपंचायतीने राबवलेल्या अभिनव उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. गावातील सर्व 350 शौचालयांच्या व्हेंट पाईपला कापडी जाळ्या बसवून डासांची उत्पत्ती रोखण्यात ग्रामपंचायतीला मोठे यश मिळाले आहे. या उपक्रमामुळे गेल्या वर्षभरात गावात एकही डेग्यूचा रुग्ण आढळून आला नाही.
पावसाळा संपत असताना विविध ठिकाणी डासांची वाढ होऊन डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया सारखे रोग फैलावत असतात. हे डास विशेषतः शौचालयांच्या सेफ्टी टँक, मोकळ्या टायर किंवा साचलेल्या पाण्यात वाढतात. या पार्श्वभूमीवर उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवाहनास प्रतिसाद देत तासवडे ग्रामपंचायतीने आरोग्य उपक्रम राबवला. ग्रामपंचायतीने गावातील सर्व शौचालयांची पाहणी करून प्रत्येक व्हेंट पाईपवर कापडी जाळी बसवली, ज्यामुळे डासांच्या प्रवेशावर प्रतिबंध बसला.
या उपक्रमाची दखल घेत सातारा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी तासवडे गावाला भेट देत संपूर्ण गावाची पाहणी केली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या या प्रयत्नांचे कौतुक करत इतर ग्रामपंचायतींनाही तासवडेचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. यावेळी उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. श्रेया खंडागळे, सरपंच सौ. दिपाली जाधव, ग्रामसेवक महादेव जाधव, सिनेट सदस्य अमित जाधव, उपसरपंच सौ. मनीषा जाधव, ग्रा. सदस्या सौ. लता जाधव, आरोग्य निरीक्षक विकास गरुड, सीएचओ रीना बिक्कड, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. गावकऱ्यांच्या सहभागामुळे तासवडे डेंग्यमुक्त या दर्जाला पात्र ठरले आहे.