

खेड : सातारा तालुका पंचायत समितीचे सभापती पद खुले झाल्याने तालुक्यातील अनेक इच्छुकांनी सभापती झाल्याची दिवास्वप्ने पाहायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी चुरस वाढणार आहे. सभापती मंत्र्यांचा, खासदारांचा की दोन्ही आमदारांचा याचे औत्सुक्य लागून राहिले आहे. या पंचायत समितीवर खा. उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांचाच वरचष्मा असला तरी आता सभापतिपद खुले झाल्याने त्यांची डोकेदुखी वाढणार आहे. दोन्ही राजेंच्या शिलेदारांनी मैदानात उतरण्याची जय्यत तयारी केली आहे. ‘आता लढायचंच’, असा इरादा अनेकांचा दिसत असल्याने सातारा तालुक्यात घमासान होण्याची चिन्हे आहेत.
सातारा तालुका पंचायत समितीवर माजी मंत्री स्व.आ. अभयसिंहराजे भोसले यांच्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी पंचायत समिती मध्ये 20 सदस्य होते. परंतु सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर तालुक्यातील शाहूपुरी व गोडोली हे दोन गट आणि चार गण कमी झाले. त्यामुळे आता सातारा तालुक्यात आठ जि.प. गट तर 16 पंचायत समितीचे गण झाले आहेत. सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांची संख्या वाढणार असून तालुक्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
गत वेळी दोन्ही राजांच्या शिलेदारांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी पंचायत समितीमध्ये ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाचे 11, खा. उदयनराजे भोसले यांचे 8 तर आ. मनोजदादा घोरपडे एक सदस्य असे बलाबल होते. बदलत्या परिस्थितीत दोन्ही राजांच्या मनोमिलनाचे वारे तालुक्यात वाहू लागले आहे. तर आ. मनोजदादा घोरपडे हेही भाजपमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील परंतु सातारा तालुक्यात येणारे गट व गण आहेत. त्यामुळे आ. महेश शिंदे यांची भूमिकाही यावेळी महत्वाची ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुती म्हणून लढली जाणार का? तालुक्यात दोन्ही राजांचे मनोमिलन होणार की, इच्छुक उमेदवार मनोमिलनाला छेद देणार? याची उत्सुकता लागली आहे. काही झाले तरी अनेक शिलेदारांनी लढण्याचाच पावित्रा घेतला आहे. दोन्हीकडे संधी न मिळाल्यास काही शिलेदारांनी वेगळा पर्यायही चाचपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आ. शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्षपदी कार्यरत आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी करताना दोन्ही राजांकडे संधी न मिळालेल्या नाराजांची व महाविकास आघाडीची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न राहिल, असे राजकीय वातावरण आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्याकडून प्रतिष्ठा पणाला लावून तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
गतवेळी सातारा तालुका पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण हे पहिल्या अडीच वर्षासाठी इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. त्यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले गटाकडून मिलिंद कदम यांना संधी मिळाली. तर नंतरच्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण झाल्यानंतर सरिता इंदलकर यांना पंचायत समितीच्या सभापतिपदाची संधी मिळाली. यावेळी सभापती पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुणाच्या नावाची आहे चर्चा...
सभापतिपदासाठी राजूभैया भोसले, सुनीलतात्या काटकर, अरविंद चव्हाण, धर्मराज घोरपडे, नामदेव सावंत, विक्रम पवार, राहुल शिंदे, साईराज कदम, महेश गाडे, अॅड. अनिल सोनमळे आदींच्या नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, दोन्ही राजेंच्या विरोधात लढण्यासाठी सातारा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), कॉग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांनी मोर्चेबांधणी केल्यास लढती चुरशीच्या होणार आहेत.