Satara Politics: गीतांजली कदम, मेघाताई नलवडे, ऋषिका साबळे-पाटील रेसमध्ये

पाटखळ गटातून कोण -कोण लढणार? : दोन आमदार, खासदार व मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Satara Politics: गीतांजली कदम, मेघाताई नलवडे, ऋषिका साबळे-पाटील रेसमध्ये
File Photo
Published on
Updated on

राजेंद्र साबळे

शिवथर : पाटखळ जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले असल्यामुळे इच्छुकांची संख्या अधिक आहे. या गटात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे यांचे प्रत्येक गावात प्रबळ गट आहेत. त्यामुळे या गटात भाजपची ताकद दिसत असली तरी आ. शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी एकसंघपणे विरोधात उभी राहिली तर येथे तुल्यबळ लढत होवू शकते, असे वातावरण आहे. सौ. गीतांजली कदम, मेघाताई नलवडे, ॲड. ऋषिका किरण साबळे-पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे या गटात दोन आमदार, खासदार व मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

पाटखळ जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडल्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस युवराज पवार, पंचायत समितीसाठी प्रबळ दावेदार असणारे माजी पंचायत समिती सदस्य राहूल शिंदे यांच्यासह इतरही सर्वसाधारण गटातील इच्छुकांची कोंडी झाली. सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे या ठिकाणी खा. उदयनराजे भोसले यांच्या कट्टर समर्थक सौ. गीतांजली कदम, आ. शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या सौ. मेघाताई नलवडे, माजी कृषि सभापती किरण साबळे पाटील यांच्या कन्या ॲड. ऋषिका साबळे पाटील यांच्या उमेदवारीचीही सध्या जोरदार चर्चा आहे.

गीतांजली कदम प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या जात आहेत. त्यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून या गटांमध्ये विविध विकासाची कामे करून प्रत्येक गावामध्ये चांगला लोकसंपर्क ठेवला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागांमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकसंघ ठेवण्याचे काम केले आहे. त्यांनी आ. महेश शिंदे यांच्या निवडणुकीत खा. उदयनराजेंच्या आदेशानुसार जोरदार काम केले हेोते. या कामाची पोहोच पावती म्हणून त्यांना उमेदवारी मिळू शकते. या गटातील प्रत्येक गावात त्यांचे स्वत:चे नेटवर्क आहे. कार्यकर्त्यांची हीच मजबूत फळी त्यांच्यासाठी जमेची बाजू समजली जाते. सध्याचे वातावरण पाहता त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे.

वाढे गावच्या सूनबाई व सामाजिक कार्याची जाण असणाऱ्या मेघाताई नलवडे या आ. शशिकांत शिंदे गटाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून व महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे. त्याचबरोबर वाढे गावामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून कोट्यवधींची विकास कामे केली आहेत.

ॲड. ऋषिका साबळे-पाटील या माजी कृषि सभापती किरण साबळे-पाटील यांच्या कन्या असून त्यांच्या उमेदवारीचीही चर्चा आहे. किरणनानांची या गटात चांगली पकड आहे. विविध विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत. त्यामुळे त्याचा फायदा ऋषिका साबळे-पाटील यांना होवू शकतो.

खा. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले हे भाजपाचे लोकप्रतिनिधी आहेत तर आ.महेश शिंदे हे शिवसेना गटाचे जरी असले तरी ते शिवसेनेबरोबरच भाजपाचेही प्रामुख्याने काम करतात. त्यामुळे या गटामध्ये या तिघांच्या विचाराने एकत्रित उमेदवार देण्याचाही प्रयत्न असू शकतो. आ. शशिकांत शिंदे यांची भुमिकाही येथे निर्णायक ठरणार आहे. महाविकास आघाडीची एकत्रित मोट बांधून त्यांनी तोडीस तोड उमेदवार दिल्यास या गटात जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत.

या गटांतर्गत असणाऱ्या शिवथर गणामधून नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडल्यामुळे ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या कट्टर समर्थक वडूथच्या वनिता गोरे इच्छूक आहेत. त्यांनी 2002 व 2017 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती तर 2007 मध्ये पंचायत समितीची निवडणूक लढवून जिंकली होती. पंचायत समितीच्या सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात त्यांनी विकासाची कामे केली आहेत. ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी ठरवले तर त्यांना चौथ्यांदा संधी मिळू शकते. आ. महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक वडूथ गावचे माजी सरपंच किशोर शिंदे हेही शिवथर गणातून प्रबळ दावेदार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news