

सातारा : पाटखळ, ता. सातारा येथील गावठाणाची जागा असलेल्या ज्योतिबाचा माळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून ट्रॅक्टर ट्रॉलीव्दारे इतर ठिकाणचा कचरा टाकण्यात येत आहे. काही कचरा ठेकेदारांकडून ग्रामपंचायत प्रशासनाच्या संगनमताने हा रात्रीच्या अंधारात उपद्रव केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी होत आहे.
शासनाच्यावतीने गावोगावी स्वच्छतेचा जागर केला जात असून कचरा व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. असे असताना जिल्ह्याच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाटखळ गावात मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. गावामधील कचरा तसेच पंचक्रोशीतील काही गावांमधील कचरा उचलण्याचा ठेका घेवून हा कचरा ज्योतिबाचा माळ परिसरातील गायरानावर टाकला जात आहे. काही दिवसांपूर्वी महिलांच्या झालेल्या बैठकीत याला विरोध झाला. मात्र, त्याला न जुमानता ग्रामपंचायत प्रशासनाशी संगनमत करून कचरा ठेकेदाराकडून हा कचरा टाकण्याचा खटाटोप केला जात आहे.
कचरा टाकलेल्या ठिकाणापासून काहीच अंतरावर या परिसरात एक अंगणवाडी, पाचवी ते 10 वीपर्यंतचे हायस्कूल आहे. शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. या कचर्यामुळे परिसरात दुर्गंध व अनारोग्य पसरुन या विद्यार्थ्यांच्या आरोग्य धोक्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे साथरोगाचा प्रादुर्भाव पसरला आहे. अशात गावातील कचरा या परिसरात टाकल्यामुळे ज्योतिबाचा माळावरील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग तसेच पाणी व स्वच्छता विभागाकडून या प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.