

खंडाळा : पुणे ते बंगळूर महामार्गावर पारगावच्या प्रवेशद्वाराजवळ मालट्रकचा टायर फुटल्याने ट्रक पलटी होऊन त्याखाली दोन वाहने चिरडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुण्याहून साताऱ्याच्या दिशेकडे जाणारा बारा चाकी मालट्रक पारगाव प्रवेशद्वाराच्या कमानी समोर दुपारी दीडच्या सुमारास आल्यानंतर ट्रकचा टायर फुटला. यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला लावलेल्या दोन वाहनांवर पलटी झाला. यामध्ये चार चाकी टोइंग क्रेन व मारुती स्विफ्ट कार चिरडली गेली. या अपघातात सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, स्विफ्ट डिझायर व क्रेनचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात पारगाव प्रवेशद्वाराजवळ लावलेला हाय मास दिव्याचा खांब उखडून पडला. या पोलमुळे पारगाव ग्रामपंचायतच्या घंटागाडीचेही नुकसान झाले. रविवारी आठवडा बाजार असल्याने अपघात ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या अपघाताची नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात झाली आहे.