

सातारा : सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवकपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), मागासवर्गीय (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गांसाठीची आरक्षण सोडत बुधवार, दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता श्री छत्रपती शाहू कला मंदिर येथे पार पडणार आहे. या सोडत प्रक्रियेची घोषणा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केली आहे.
सातारच्या प्रभागनिहाय आरक्षणाची अधिकृत यादी दि. 9 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर नागरिक, राजकीय पक्ष किंवा इच्छुक उमेदवार यांना आरक्षणासंदर्भात हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी 9 ते 14 रोजीपर्यंत मुदत दिली आहे. संबंधित अर्ज कार्यालयात दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता असल्यास संबंधितांना स्वतंत्ररीत्या कळवले जाणार आहे.
आरक्षणाची सोडत ही पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे. सातार्यातील महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वामुळे या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या प्रभागात महिला उमेदवारांना संधी मिळणार याबाबत राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी यांनी या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. इतर राजकीय पक्षांनी देखील प्रभागनिहाय संभाव्य उमेदवारांच्या शोधाला सुरुवात केली आहे. मागील आरक्षणाच्या तुलनेत या वर्षी कोणते प्रभाग बदलणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंबईत आज होणार्या नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडे लक्ष
नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत आज मुंबई येथे मंत्रालयात होणार आहे. सातार्यातील दोन्ही आघाड्या व विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांचे लक्ष या सोडत प्रक्रियेकडे लागले आहे. नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सातार्यातून अनेक इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे. मागील आरक्षण बदलणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. सातार्यातील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे इतर
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला/सर्वसाधारण) किंवा अनुसूचित जाती (महिला) पडेल, अशी अटकळ बांधली जात आहे. परंतु, हे आरक्षण पुन्हा नव्या रोटेशनने सुरु होईल, अशी प्रशासकीय पातळीवर चर्चा आहे. या आरक्षण सोडतीवर अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. या सोडतीच्या पार्श्वभूमीवर सातार्यातील दोन्ही राजांच्या गटांत तणाव व उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्ष आरक्षण सोडतीनंतर सातार्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार असल्याची चिन्हे आहेत.