

वैभव पाटील
उंडाळे: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे 35 वर्षे नेतृत्व करणारे माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांचा राजकीय जन्म झालेल्या येळगाव जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीत खुला राहिला आहे. तर याच गटातील येळगाव पंचायत समिती येळगाव गण सर्वसाधारण महिला आणि सवादे गण सर्वसाधारण वर्गासाठी खुला राहिल्याने हॅट्रीक झाली आहे. जि.प.चे माजी सदस्य ॲड. उदयसिंह पाटील यांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर विरोधी भाजपा कडून त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ स्व. विलासराव उंडाळकर यांनी अत्यंत अडचणीतून बांधला आहे. या मतदारसंघावर पन्नास वर्षे त्यांची घट्ट पकड होती. विलास काकांच्या निधनानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीची ही पहिलीच निवडणूक होत आहे. विद्यमान आ.डॉ.अतुलबाबा भोसले यांनी या मतदारसंघात सत्तेच्या जोरावर शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे घटक पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होण्याची शक्यता आहे.
उदयसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात असून त्यांच्यावर कराड तालुक्याची जबाबदारी राहणार आहे. शिवाय या जि.प.गटाचे उमेदवार उदयसिंह पाटीलच राहतील अशी शक्यता आहे.या मतदारसंघात विरोधी भाजपाला उदयसिंह पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे.या मतदारसंघात सवादेचे मसाला उद्योजक संजय शेवाळे यांची उमेदवारी राहण्याची शक्यता आहे. गत आरक्षणावेळी संजय शेवाळे हे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण सध्या जिल्हा परिषदेचे आरक्षण खुले राहिल्याने त्यांना जिल्हा परिषदेसाठी लढवले जाऊ शकते. तसे झाले नाही तर सवादे पंचायत समिती गण ही खुला राहिल्याने शेवाळे पं.स. ची निवडणूक लढतील.
उदयसिंह पाटील यांचे बंधू राजाभाऊ पाटील हेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजप काय खेळी खेळते यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत. राजाभाऊ पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी पक्षातच कार्यरत आहेत. उदयसिंह पाटील हे ही राष्ट्रवादीतच आहेत.
उदयसिंह पाटील यांना जिल्हा परिषद तर राजाभाऊ यांना सवादे पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली तर दोघा बंधूंचा वाद मिटू शकतो असे कार्यकर्त्यांचे मत आहे.परंतु एकाच कुटुंबातील दोन उमेदवार देणे राष्ट्रवादी पक्षाला कितपत योग्य वाटते यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.
पंचायत समिती सवादे व येळगाव हे दोन्ही गण यावेळी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कराड तालुका पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी खुले आहे. येळगाव गण सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे. त्यामुळे या मतदारसंघात त्या तोडीचा उमदेवार निवडावा लागेल. माजी सभापती फरिदा इनामदार आणि मुंबईचे माजी महापौर बाबुराव शेटे यांच्या स्नुषा, संजय शेटे यांच्या पत्नी सौ. शेटे, स्वा.सै. शामराव पाटील पतसंस्थेच्या संचालिका सौ.वर्षाराणी प्रकाश पाटील यांचेही नाव पुढे येऊ शकतात. भाजपमधून स्व. संजय शेटे यांच्या कुटुंबातील एखाद्या महिलेचा विचार होऊ शकतो. याशिवाय येवती विभागातील एखादी महिला या निवडणुकीसाठी पुढे येऊ शकते. परंतु निश्चित स्वरूपात ताकतीने लढेल असा उमेदवार सध्या तरी विरोधकाकडे दिसत नाही. त्यामुळे आ.डॉ.अतुलबाबा भोसले जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असेल. सवादे गणात उद्योजक संजय शेवाळे हे आधीपासूनच इच्छुक आहेत. याशिवाय भाजप सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष व युवा नेते पंकज पाटील साळशिरंबेकर यांनी उमेदवारीचा दावा केला आहे.