

सातारा : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका व नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले. सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड व मलकापूर या नगरपालिका व मेढा नगरपंचायतीत धुमशान सुरू झाले आहे. 9 नगरपालिकांमध्ये 115 प्रभागांत 233 नगरसेवकपदांसाठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. 32 नगरसेवकपदे वाढल्याने नव्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. या निवडणुकीत 117 जागांवर महिलाराज अवतरणार आहे.
जिल्ह्यात सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, म्हसवड व मलकापूर या नऊ नगरपालिकांसह मेढा नगरपंचायतीची मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जनगणना न झाल्याने मागील दहा वर्षांत वाढलेल्या संख्येचे प्रमाण लक्षात घेऊन सरकारने अ, ब आणि क वर्ग नगरपालिकांची सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिह्यात 24 नगरसेवक वाढले आहेत. त्यामध्ये सातारा शहराची पूर्वीची नगरसेवकसंख्या 40 होती. हद्दवाढ झाल्यामुळे 8 नगरसेवकपदे वाढली. सातारा ही जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे.
‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात 1 लाख 38 हजार लोकसंख्येच्या पुढील 8 हजार लोकसंख्येमागे 1 नगरसेवकपद यानुसार साताऱ्यात 2 नगरसेवकपदे वाढली आहेत. फलटण नगरपालिकेची पूर्वीची नगरसेवकसंख्या 25 होती ती आता 27 होणार असून या पालिकेत 2 नगरसेवक वाढणार आहेत. तसेच कराड नगरपालिकेची पूर्वीची नगरसेवकसंख्या 29 होती ती आता 31 इतकी होणार आहे. या दोन्हीही ‘ब’ वर्ग नगपालिका असून या नगरपालिकांच्या क्षेत्रात 40 हजार लोकसंख्येच्यापुढे प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे 1 नगरसेवकपद वाढले आहे. ‘क’ वर्ग नगरपालिका असलेल्या वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर आणि म्हसवड या नगरपालिकांमध्ये 25 हजार लोकसंख्येसाठी 17 नगरसेवकपदे तर मलकापूर नगरपालिकेत 19 नगरसेवक होते. या नगरपालिका क्षेत्रात प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे 1 नगरसेवकपद यानुसार मलकापूरमध्ये 3 नगरसेवकपदे वाढली असून या नगरपालिकेची नगरसेवकसंख्या 22 झाली आहे. तर वाई, महाबळेश्वर, पाचगणी आणि म्हसवड या नगरपालिकेत प्रत्येकी 3 पदे वाढल्याने त्यांची नगरसेवक संख्या प्रत्येकी 20 इतकी होणार आहे.
लोकसंख्या वाढीचे निकष लावून राज्य शासनाने त्या-त्या नगरपालिकेत नगरसेवकसंख्या वाढली आहे. राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्या आणि अपक्ष उमेदवार सर्वच आता निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. 10 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 18 नोव्हेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी तर 25 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. मतदान 2 डिसेंबरला होणार असून 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील या दहाही शहरांत राजकीय वातावरण तापले आहे.
प्रचारासाठी फक्त 13 दिवस
नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी फक्त 13 दिवस मिळणार आहेत. त्यामुळे इच्छुकांना प्रचाराचा वेग वाढवावा लागणार आहे. इच्छुक आता सकाळपासून रात्रीपर्यंत प्रभागात धावाधाव करत आहेत. घराघरांत भेटीगाठींना वेग आला असून सोशल मीडियावर मोहीम सुरू झाली आहे. प्रभागात लहान मेळावे घेणे हेच प्रचाराचे मुख्य साधन ठरणार आहे. मर्यादित वेळ असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते रात्रंदिवस कामाला लागले आहेत.