

सातारा : सातारा शहरात शिक्षणासाठी वास्तव्य करत असलेल्या अल्पवयीन मुलीची ओळख झाल्यानंतर त्या ओळखीचा गैरफायदा घेवून वारणानगर, जि. कोल्हापूर येथील संशयिताने वेळोवेळी अत्याचार केले. संशयिताने मुलीला थारमध्ये बसवून जबरदस्तीने तिला आयफोन दिला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. अनिल विष्णू कोकाटे-पाटील (रा. सावित्री पार्क वारणानगर, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार पीडित मुलगी 15 वर्षांची आहे. जुलै 2025 मध्ये तक्रारदार मुलीची तिच्या मैत्रिणीच्या ओळखीतून संशयित अनिल कोकाटे याच्याशी ओळख झाली. यावेळी संशयिताने पीडित मुलीचा मोबाईल क्रमांक घेवून फोन करण्यास सुरुवात केली. तसेच पीडित मुलीच्या वडीलांनाही फोन करुन घरगुती संबंध वाढवले. दि. 4 ऑगस्ट रोजी पीडित मुलीला संशयित अनिल कोकाटे भेटला व मुलीला ड्रेस घेणार असल्याचे म्हणाला. त्यावर पीडित मुलीने ड्रेस नको असल्याचे सांगितले. मात्र संशयिताने जबरदस्तीने मुलीला त्याच्या थारमध्ये बसवून नेले व ड्रेस घेतला.
तसेच समर्थ मंदिर परिसरात मुलीला नेवून तेथील एका फ्लॅटवर मुलीला ड्रेस घालायची जबरदस्ती केली. या सर्व घटनेने मुलगी घाबरली. याचाच गैरफायदा घेवून संशयिताने मुलीवर अत्याचार केला. अत्याचाराच्या घटनेमुळे मुलगी अधिक घाबरली. यावेळी संशयिताने याबाबतची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर संशयिताने पुन्हा मुलीला आयफोन भेट दिला. मुलीने फोन नको असल्याचे सांगितले. मात्र संशयिताने पुन्हा धमकी दिली. यानंतर धमकी देवून संशयिताने पुन्हा दोनवेळा समर्थ मंदिर चौक परिसरात एका फ्लॅटमध्ये मुलीवर अत्याचार केला.
तीनवेळा अत्याचार झाल्याने मुलगी अबोल झाली. कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तिला बोलते केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. यामुळे कुटुंबीयांनी मुलीला शहर पोलिस ठाण्यात नेवून संशयिता विरुध्द पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली.
अत्याचार करायचा अन् गोळ्या द्यायचा...
संशयित अनिल कोकाटे याने तीनवेळा मुलीवर अत्याचार केला आहे. अत्याचारानंतर संशयिताने मुलीला जबरदस्तीने औषधं गोळ्या खायला दिल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पिडीत मुलगी सातार्यात शिक्षणासाठी वास्तव्य करत असताना तिच्या मैत्रिणीचा संशयित नातेवाईक आहे. या ओळखीतून त्याने गैरप्रकार केला असल्याचे समोर येत आहे.