

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे 65 गट व पंचायत समितीच्या 130 गणांची सोमवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही आरक्षण सोडत चक्रानुक्रमाने काढण्यात येणार आहे.
जि. प. गटांची जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात, तर 11 पंचायत समित्यांचे त्या-त्या तालुक्यात गणांची सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
सोमवार, दि. 13 रोजी खंडाळा पंचायत समितीची आरक्षण सोडत तहसील कार्यालय, खंडाळा येथे सकाळी 11.30 वाजता होणार आहे. याचबरोबर फलटण पंचायत समितीची सोडत सजाई गार्डन मंगल कार्यालय जाधववाडी, माण पंचायत समितीची आरक्षण सोडत तहसील कार्यालय दहिवडी, खटाव पंचायत समितीची आरक्षण सोडत पंचायत समिती सभागृह खटाव, कोरेगाव पंचायत समितीची आरक्षण सोडत तहसील कार्यालय कोरेगाव, वाई पंचायत समितीची आरक्षण सोडत देशभक्तकिसनवीर सभागृह पंचायत समिती वाई, महाबळेश्वर पंचायत समितीची आरक्षण सोडत मध संचालनालय सभागृह महाबळेश्वर, जावली पंचायत समितीची आरक्षण सोडत पंचायत समिती सभागृह मेढा, सातारा पंचायत समितीची आरक्षण सोडत स्व.अभयसिंहराजे भोसले पंचायत समिती सभागृह सातारा, पाटण पंचायत समितीची आरक्षण सोडत लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी संकुल काळोली पाटण आणि कराड पंचायत समितीची आरक्षण सोडत स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊन हॉल) कराड येथे काढण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद 65 गटांचे आरक्षण जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत काढले जाणार आहे. तर 130 पंचायत समिती गणांचे आरक्षण प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थितीत काढले जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे व पंचायत समिती सभापतिपदाच्या आरक्षण सोडतीनंतर गट व गणाची आरक्षण सोडत निघत आहे.