

सातारा: जिल्हा परिषदेच्या (ZP) माध्यमिक शिक्षण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत एका महिला क्लार्कला २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. वैशाली शंकर माने (वय ४०, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) असे या क्लार्कचे नाव असून, तिच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेसह साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे एक निवृत्त शिक्षक आहेत. त्यांचा २४ वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण असलेला निवड श्रेणी प्रस्ताव माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी दाखल होता. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी निवृत्त शिक्षक क्लार्क असलेल्या वैशाली माने यांना भेटले. माने यांनी 'साहेबांना देण्यासाठी' म्हणून त्यांच्याकडे २५,००० रुपये लाचेची मागणी केली.
लाचेची मागणी होताच तक्रारदार निवृत्त शिक्षकांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) तक्रार दाखल केली. एसीबीने (दि. २७ ऑक्टोबर) रोजी तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर) लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा (ट्रॅप) लावला. दुपारी ही महिला क्लार्क रोख रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने तिला रंगेहाथ पकडून कारवाई केली.
पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. सातारा शहरासह जिल्ह्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.