

सातारा : सासपडे येथे अल्पवयीन मुलीचा खून केल्याप्रकरणी कोठडीत असलेल्या संशयित राहुल यादव याने आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला. फेब्रुवारी 2025 मध्ये मुलीवर अत्याचार करून तिचा खून करून विहिरीत मृतदेह टाकला असल्याची कबुली दिली. त्याच्या या कबुलीने नराधमाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, फेब्रुवारीत घडलेल्या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे.
सासपडे, ता. सातारा येथे दि. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 ते 3 च्या सुमारास राहत्या घरात अल्पवयीन मुलीचा रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. तिला उपचारासाठी नेले असता तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले होते. बोरगाव पोलिस ठाण्यात त्यानुसार पोक्सो, खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर साक्षीदारांकडे केलेली चौकशी व तांत्रिक तपास यावरुन हे कृत्य राहुल बबन यादव (रा. सासपडे ता.सातारा) याने केले असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासात नराधम यादवला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.
पोलिस दि. 10 ऑक्टोबरच्या खुनाचा तपास करत असतानाच त्याची पुन्हा पोलिस कोठडी घेण्यात आली. यामध्ये राहूल यादव याने फेब्रुवारी 2025 मध्ये गावातीलच आणखी एका मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून करुन मृतदेह विहिरीमध्ये टाकून दिला, अशी कबुली दिली. बोरगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी दाखल असलेल्या मूळ गुन्ह्यात नव्याने अत्याचार, खुनाची कलमे वाढवण्यात आली आहेत. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण देवकर हे करत आहेत.