

फलटण : मी कधी केोणाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला का? आता विचारतायंत मास्टरमाईंड कोण? हिंमत असेल तर घे ना नाव. मग बघा 1985 पासूनचा इतिहासच बाहेर काढतो. ज्याने त्याने ठरवावे कुणाच्या सांगण्यावरून किती बोलायचे. मी कुणाला घाबरत नाही. तुमच्या मास्टरमाईंडला तर चुकून घाबरत नाही. वयाच्या 77 व्या वर्षी तुरूंगात टाकायचे म्हणतो. तू तुरूंगात टाकचं मग तुला बघतोच, तू कसा फलटणमध्ये राहतो ते. तुरूंगामध्ये राहून तुला थर्ड लावीन, अशा शब्दात विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांना ललकारले. दरम्यान, सभापती असताना मला खंडणी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा गौप्यस्फोटही आ. रामराजेंनी केला.
फलटण येथील शनिनगर परिसरातील विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, मिलिंद नेवसे, किशोर ना. निंबाळकर, प्रगती कापसे, सनी अहिवळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. रामराजे म्हणाले, परवाच्या भाऊबीजेनंतर माझी मनस्थिती काही ठीक राहीली नाही. मी काय षडयंत्र रचले, मी तर पुण्यात होतो. त्याला मी अगोदरच सांगितल होतं, माझ्या नादाला लागू नको, आता मी त्याला हिसका दाखवणार. माझं नाव घ्यायचं आहे तर प्रॉपर माणसाला घ्यायला सांगा ना. 2022 मध्ये दोन ठेकेदारांच्या भांडणात मला गुंतवण्याचा प्रयत्न केला. आर्थिक गुन्हे शाखा, पुणे यांचे पत्र आहे. पुण्यातील घरात बोलावून ठेकेदारांना खंडणी मागितली, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून मागणी केली. मुख्यमंत्र्यांपर्यंत बातमी पोहचल्यानंतर त्यांनी कुणालाही यात गुंतवू नका, असे सांगितले. हे कोण करतयं. मुख्यमंत्र्यांना कळालं म्हणून नाहीतर सभापती असताना खंडणीच्या गुन्ह्यात अडकलो असतो.
यांचे काम म्हणजे याला गुतव, त्याला गुतव, तुझे वाळूचे ठेके बंद करतो. माझ्याकडे आला तर वाळूचे ठेके देतो. आमच्याकडून हजार चुका झाल्या असतील पण असले राजकारण कधी केले नाही. मात्र, असल्या प्रकारचे राजकारण तुमच्यापर्यंत येईल, हे मी सांगत होतो. आमच्या तालुक्याच्या कुठल्या कारखान्याच्या मुकादमाने आमचे नाव घेतले सांगा. यांनी कुणालाच सोडले नाही. बीड जिल्हा निंबाळकरांची जहागीर होती हे यांना माहित नाही, यांची चूक नाही. सगळीकडेच हा प्रकार सुरू आहे.
रामराजेंनी तुरूंगात जावं, असं तुम्हाला वाटत असेल तर तोही त्याग करायला तयार आहे. पण तुमचे काय होईल याची जाणीव तुम्ही ठेवा. सनातन यांना लिहिता येत का धर्माच राजकारण करतात. शरद पवारांना मार्गदर्शन करणारे आता तिकडे गेले आहेत. आम्हीच वाढवलेली ही बांडगूळे आहेत. आता येणारे हे आमचे इलेक्शन नाही तुमच्या भविष्याचे इलेक्शन आहे. 4 हजार खोटे मतदार नेले, वॉर्ड इकडचे तिकडे केले मग त्यांना कळाले रामराजेंच्या सोयीचे आहे, मग कपाळाला हात लावले. त्यांनी कधी कुणाचं नीट केलयं का? सगळं खोटं, सगळ झूठ. नीरा देवघर कालव्याचं कुणाला टेंडर दिलं त्यांच्याकडेही बघू. ते त्यांच्या कर्माने सापडतील. मंत्रालयात मला पाठिंबा देणारी सबंध आयएएस लॉबी आहे.
वाट आहे ती दहशतीची आहे. जे कोणी गेले त्यांना आता फटके मिळणार आहेत. तिथे परतीची वाट नाही. आम्ही 30 वर्ष काय केले यापेक्षा तुमच्यापुढे 30 वर्ष काय होणार हे बघा की. पाच वर्षातच त्यांनी एवढ केले. अशा प्रकारच्या वातावरणात एमआयडीसी येईल का? मुकादम न आल्यास नुकसान कुणाच होणार? आत्महत्या केलेल्या कुटुंबातील लोकांना हे सांगतात, रामराजेंच नाव घे. मी माझ्या नाव घेण्याची वाट बघतोय. मग मी त्यांचा 1985 पासूनचा इतिहासच सांगतो. हे सदगृहस्थ सायको आहेत. मी त्यांच्यावर टीका करतो आणि सिक्युरीटी कुणाला तर त्यांना. शनिमहाराजाला साडेसाती लावणारे हे गृहस्थ आहेत. ज्या पोलिसावर गुन्हा आहे त्याला कुणी आणला? प्रांताधिकारी मॅडमला विनंती आहे तुम्ही कोणाच्या कार्यकर्त्या होवू नका प्रांतांसारख्या नाही वागला तर तुमचाही राहूल धस होईल, असा इशारा रामराजेंनी दिला.
झेडपी, पालिका, कारखान्याची सत्ता ताब्यात द्या. दिल्लीतील त्यांचे वजन कमी होईल. त्यांच्या कपाळावरील सत्तेचा हात जावू द्या मग त्यांना कळेल किती नावं बाहेर येतील. काळ्या कुट्ट इतिहासातील माणसे तुमचे भविष्य काळेकुट्ट केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही आ. रामराजेंनी दिला.